Netra Kumbha : महाकुंभपर्वात ‘नेत्र कुंभा’चे ५ जानेवारीला उद्घाटन
५ लाख लोकांच्या नेत्र तपासणीचे लक्ष्य, तर ३ लाख चष्म्यांचे वाटप करणार
प्रयागराज – महाकुंभपर्वात ‘नेत्र कुंभा’चे आयोजन करण्यात आले असून येत्या ५ जानेवारीला त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. येथील नागवासुकी मंदिराजवळ हा ‘नेत्र कुंभ’ असेल. यामध्ये ५ लाखांहून अधिक लोकांची नेत्र तपासणी आणि ३ लाखांहून अधिक चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासह भाविकांना विनामूल्य औषधे आणि शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते ‘नेत्र कुंभा’चे उद्घाटन होणार आहे. या वेळी गौरांग प्रभु आणि रा.स्व. संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
नेत्र तपासणीचा जागतिक विक्रम होणार !
या नेत्र कुंभच्या आयोजक समितीचे सदस्य डॉ. वाजपेयी म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेत्रतपासणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वेळी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवलेल्या या कार्यक्रमाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद व्हावी, यासाठी या वेळी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमाला देशभरातून येणार्या डॉक्टरांसाठी भोजन आणि निवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमात अनुमाने २४० रुग्णालयातील डॉक्टर सहभागी होणार आहेत. चष्म्याचा दर्जा राखण्याचे दायित्व एकाच विक्रेत्यावर सोपवण्यात आले आहे. या प्रसंगी नेत्रदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वेळी ११ सहस्रांहून अधिक लोकांनी नेत्रदान केले होते, त्यात यंदा आणखी वाढ करण्याचा प्रयत्न आहे.