पुणे येथे वेदनाशामक औषधांची विक्री करणार्या तरुणीला अटक !
नशा करण्यासाठी औषधांचा उपयोग
पुणे – वेदनाशामक, भूल देण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधांचा नशा करण्यासाठी उपयोग केला जात असल्याचे समोर येत आहे. अशा औषधांची विनाअनुमती विक्री करणार्या अंबिका उपाख्य नेहा ठाकूर या तरुणीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून १ लाख रुपयांच्या ‘मेफेटरमाईन सल्फेट’ औषधाच्या (टर्मिन) १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तिच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्यांवर कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक) अंबिकाकडे औषध विक्रीचा परवाना नाही. तिच्याकडे औषध निर्मिती अभ्यासक्रमाची (फार्मसी) पदवी नाही. आधुनिक वैद्यांच्या सल्ल्याविना या औषधांचा उपयोग केल्यास जीविताला धोका आहे. गंभीर इजा होऊ शकते, याविषयी तिला माहिती होती. तरीही ती अशा प्रकारच्या औषधांची विक्री करतांना २६ डिसेंबर या दिवशी सापडली.