मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा !

संतोष देशमुख

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये २८ डिसेंबर या दिवशी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यात भाजपचे आमदार सुरेश धस आणि अभिमन्यू पवार, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सर्व नेत्यांनी भाषणे करत लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली.

शस्त्र परवाने देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – सुरेश धस

सुरेश धस

आमदार सुरेश धस म्हणाले, ‘‘बीड जिल्ह्यात ‘गोली मार कीधर भी’, असे चालू झाले आहे. जिल्ह्यात १ सहस्र २०० शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात आले आहेत. हे परवाने ज्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी वाटले, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांना वाचवत आहेत. त्यांचा दबाव पोलीस यंत्रणेवर आहे. या प्रकरणी अजित पवार यांनी लवकर निर्णय घेतला नाही, तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. बीडमधील काही पोलीस हे कार्यकर्ते म्हणून काम करतात.’’

या वेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, ‘‘कोपर्डीत ज्या प्रकारे मोर्चे निघाले, त्याचप्रकारे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधातसुद्धा राज्यभरात मोर्चे निघतील. वाल्मिक कराड अथवा अन्य कुणीही असो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.’’ आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, ‘‘धनजंय मुंडे यांनी पालकमंत्रीपदाचे अधिकार मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनावर वचक निर्माण केला. त्यांनी आपल्या सहकार्‍यांच्या साहाय्याने निष्पाप लोकांवर गुन्हे नोंद केले. हे लोक गोदावरी नदीतून शेकडो ट्रक वाळूचा अवैध उपसा करतात. त्यामुळे या वाल्मिक कराडच्या मागे असणारे धनंजय मुंडे मंत्रीपदावर असेपर्यंत या प्रकरणाचे योग्य अन्वेषण होणार नाही. कुणीही न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाच्या निष्पक्षसाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा.’’

या प्रसंगी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली, ‘‘माझ्या वडिलांनी कोणताही गुन्हा केला नसतांना त्यांना हाल हाल करून मारण्यात आले. त्यांनी शेवटपर्यंत समाजसेवा केली. असा प्रसंग भविष्यात कुणावरही येऊ नये.’’

संपादकीय भूमिका

राज्यात लोकप्रतिनिधींच्या होणार्‍या हत्या, हे पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे द्योतक !