वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ४५ वाहनचालकांचे परवाने निलंबित !
नवी मुंबई – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ४५ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही वाशी वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी दिली. पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशाने १ ते २५ डिसेंबर या काळात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या ५ सहस्र ७८६ वाहनचालकांकडून ५० लाख ४३ सहस्र रुपये दंड आकारण्यात आला होता. त्यापैकी ४ लाख २८ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला. मद्यपी असणारे, तसेच कर्णकर्कश सायलेन्सर लावून वाहन चालवणार्या ६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. १२७ वाहनचालकांविरोधात खटले प्रविष्ट करून दंड वसूल करण्यात आला. ४५ वाहनचालकांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव परिवहन विभागाकडे सादर केले आहेत. प्रसिद्धीसाठी खासगी वाहनांवर धोकादायक स्टंट करणार्या यु ट्यूबरवर कारवाई करून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला. यापुढे अशी कारवाई चालू ठेवण्यात येणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहाय्याने पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रबोधन केले. माहितीपर पत्रके वाटण्यात आली. प्रसिद्धीसाठी धोकादायक स्टंट करू नये, याविषयी जागृती करण्यात आली, अशी माहिती दिलीप गुजर यांनी दिली.