‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने करण्यात येणार्या अभूतपूर्व आध्यात्मिक संशोधनकार्यात सहभागी व्हा !
साधक, वाचक, हितचिंतक, वास्तूशास्त्राचे अभ्यासक आणि संशोधक यांना नम्र विनंती !
सध्या अनेक जण संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे वर्ष २०१४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्माचे महत्त्व सांगण्यासाठी वैज्ञानिक स्तरावर संशोधनकार्य केले जात आहे. ‘यु.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’, ‘पी.आय.पी.’ (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी), ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (Bio-well GDV), आणि ‘आर.एफ्.आय. (रेझोनेंट फिल्ड इमेजिंग)’ ही आधुनिक वैज्ञानिक उपकरणे अन् प्रणाली, तसेच ‘पेंड्यूलम’ (लोलक) यांच्या साहाय्याने हे नाविन्यपूर्ण संशोधन करण्यात येत आहे. यामध्ये हिंदु धर्मातील आचार, यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण आदी धार्मिक कृती; देश-विदेशांतील तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थाने आणि संतांची ऐतिहासिक स्थळे; ठिकठिकाणची माती आणि पाणी; सात्त्विक संगीत, नृत्य, वाद्यवादन आदी कला इत्यादींच्या संदर्भात केले जाणारे विविधांगी संशोधन अंतर्भूत आहे. या संशोधनाला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म-परीक्षणाची जोड देऊन विश्लेषण करण्यात येत आहे. त्यामुळे बुद्धीजीवी समाजावर अध्यात्माचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होत आहे. या आध्यात्मिक संशोधनाचे काही वैशिष्ट्यपूर्ण विषय पुढे दिले आहेत.
१. ‘व्यक्तीच्या साधनेचा तिच्या वापरातील वस्तूंवर किती आणि कसा परिणाम होतो ?’, हे अभ्यासणे
व्यक्ती साधना करू लागली की, तिच्यातील सत्त्व, रज आणि तम या गुणांच्या प्रमाणामध्ये हळूहळू पालट होत जातात. जसजशी व्यक्तीची साधना वाढत जाते, तसतशी तिच्यातील सात्त्विकता वाढत जाते. याचा सकारात्मक परिणाम तिचा देह, तिच्या वापरातील वस्तू, तिची वास्तू इत्यादींवर होऊन तेही सात्त्विकतेने भारित होतात. व्यक्तीच्या साधनेचा तिच्या वापरातील वस्तूंवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी सर्वसाधारण व्यक्ती, आध्यात्मिक त्रास असणारे साधक, आध्यात्मिक त्रास नसणारे साधक, ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक आणि संत यांच्या वापरांतील वस्तू, उदा. खोलीतील पंखा, दिवा, कपाट, पलंग, पटल (टेबल) इत्यादींच्या संदर्भात संशोधन करणे
२. व्यक्तीचे केस आणि नखे यांचे संशोधन
व्यक्तीची स्पंदने तिचे केस आणि नखे यांमध्येही असतात. त्यामुळे तिचे केस आणि नखे यांचे संशोधन केल्यास अध्यात्मातील नवीन पैलू उलगडण्यास साहाय्य होते. यासाठी सर्वसाधारण व्यक्ती, आध्यात्मिक त्रास असणारे साधक, आध्यात्मिक त्रास नसणारे साधक, ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक आणि संत यांचे केस अन् नखे यांचे संशोधन करणे
३. व्यक्तीच्या हस्ताक्षराविषयी संशोधन
व्यक्तीतील सत्त्व, रज आणि तम या गुणांचा तिच्या हस्ताक्षरावर परिणाम होतो. तसेच चांगले हस्ताक्षर आणि खराब हस्ताक्षर, व्याकरणदृष्ट्या शुद्ध आणि अशुद्ध हस्ताक्षर यांमधील स्पंदनेही निरनिराळी असतात. व्यक्तीची साधना जसजशी वाढत जाते, तसतसा तिच्या हस्ताक्षरावर सकारात्मक परिणाम होत जातो. पुढे तिने कसेही हस्ताक्षर काढले, तरी ते सात्त्विकच असते. या सर्व पैलूंविषयी संशोधन करणे
४. विविध प्रकारच्या वास्तूंचे संशोधन
आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी लिहिलेल्या वास्तूशास्त्रावरील ग्रंथांत विविध प्रकारच्या वास्तू कशा बांधाव्यात ? याचे समग्र ज्ञान दिलेले आहे. कलियुगात वास्तूशास्त्राचे नियम डावलून स्वतःला हवे तसे बांधकाम करण्यात येते. याचे दुष्परिणाम वास्तूत रहाणारे, तसेच सभोवतालचे वातावरण यांवर होत असतात. या वास्तूदोषांवर विविध प्रकारचे तात्कालिक उपाय शोधणारे, तसेच ते करणारे समाजात अनेकजण आहेत; पण वास्तूचा सात्त्विकतेच्या दृष्टीने अभ्यास करणारे किंवा त्या संदर्भात संशोधन करणारे कुणी नाहीत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने अशा प्रकारचे संशोधन पुढील विषयांवर करण्यात येत आहे.
४ अ. विविध मजल्यांच्या इमारतीतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास : पूर्वीसारख्या एक मजला, दोन मजले, तीन मजले यांच्या इमारती, तसेच त्याहून अधिक मजल्यांच्या टोलेजंग इमारती
४ आ. वास्तूमध्ये निवास करणार्या व्यक्तींचा वास्तूवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम : वास्तूचा व्यक्तीवर परिणाम होतो, हे सर्वश्रुत आहे; पण व्यक्तीचाही (तिच्यातील स्पंदनांचा) वास्तूवर परिणाम होतो, याविषयी मात्र समाज अनभिज्ञ आहे. सर्वसामान्य व्यक्ती, व्यावसायिक, राजकारणी, साधक, संत इत्यादी विविध व्यक्तींच्या वास्तूंचे, उदा. संतांचे निवास स्थान, आश्रम, साधकांचे निवास स्थान, ‘हॉटेल’ इत्यादींच्या संदर्भात संशोधन करणे
५. विविध विषयांवरील ग्रंथ आणि पुस्तके यांचे संशोधन
ग्रंथ आणि पुस्तके यांतून विशिष्ट स्पंदने प्रक्षेपित होत असतात. त्यांचे वाचन करणार्यांवर या स्पंदनांचा परिणाम होत असतो. या संशोधनांतर्गत वेद, महाभारत, दासबोध, कथा-कादंबर्या, कविता आणि अन्य विविध विषय यांवरील ग्रंथ अन् पुस्तके यांचे संशोधन करणे
आपण आपली आवड, कौशल्य आणि उपलब्ध वेळ (पूर्णवेळ, अर्धवेळ किंवा काही मास) यांनुसार या अभिनव संशोधन कार्यात सहभागी होऊ शकता. यासाठी पुढील सारणीनुसार स्वत:ची माहिती mav.research2014@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावी. साधकांनी ही माहिती जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
जगात अशा प्रकारे आध्यात्मिक दृष्टिकोनातून कुठेही संशोधन केलेले नाही. या अभिनव संशोधनकार्यात सहभागी व्हा !