‘डार्क वेब’चे काळे विश्व !
आपण वेब (मायाजाल), वेबसाईट (संकेतस्थळ), इंटरनेट इत्यादी शब्दांशी परिचित आहोत. याच इंटरनेटवरील मायाजालात एक मोठे क्षेत्र ज्याने व्यापले आहे, ते म्हणजे ‘डार्क वेब’ ! इंटरनेटवरील असा भाग जो नावाप्रमाणे अज्ञात असतो; मात्र तेथे अशा अनेक वाईट गोष्टी चालू असतात, त्याचा थांगपत्ताही आपणाला नसतो. संकेतस्थळावर सहज दिसणार्या आणि आपण सहज पोचू शकणार्या माहितीपर्यंतच आपला विचार असतो; मात्र त्या पलीकडे ही सर्व दुनिया असते की, ज्याकडे विशिष्ट संगणकीय प्रणालींच्या साहाय्याने जावे लागते.
१. डार्क वेब म्हणजे काय ?
डार्क वेब हे ‘वर्ल्ड वाईड वेब’चा (WWW) एक असा भाग आहे असतो, जो नेहमीच्या ‘गूगल’सारख्या ‘सर्च इंजिन’मध्ये अनुक्रमित केलेला नसतो. हे काही विशिष्ट ‘नेटवर्क’वर अस्तित्वात असते, ज्यांना ‘डार्कनेट्स’ म्हणतात आणि तेथे जाण्यासाठी विशिष्ट संगणकीय प्रणाली, काही विशिष्ट माहिती किंवा अनुमती यांची आवश्यकता असते. यामध्ये ‘डीप वेब’ अशी संकल्पना आहे, म्हणजे आपण सर्वसामान्य वापरकर्ते इंटरनेटवर काही ‘ब्राऊझर’ वापरून माहिती पाहू शकतो. ही माहिती, म्हणजे समुद्रात बुडालेल्या हिमगनाचे एक टोक असते. या समुद्रातील सर्व हिमनग, म्हणजे ‘डीप वेब’ आहे आणि ‘डार्क वेब’, म्हणजे या हिमनगाचे सुमद्राच्या तळातील टोक आहे, म्हणजे सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्ते वरवरची माहिती पाहू, हाताळू शकतात. त्यामध्ये जी प्रचंड माहिती ज्यामध्ये प्रामुख्याने इ-मेल अकाऊंट, अनेक बँका, आर्थिक संस्था यांचे ‘डाटाबेस’ (माहितीचा साठा), सामाजिक माध्यमांची खाती, खासगी उद्योगांची माहिती, कायदेशीर धारिका, काही महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील वैद्यकीय माहिती यांचा समावेश आहे. या पलीकडील म्हणजे ‘डार्क वेब’मधील माहिती म्हणजे ज्यामध्ये अगदी अनधिकृत व्यवहार, अमली पदार्थांचे व्यवहार, काही अत्यंत गोपनीय माहिती, गोपनीय व्यवहार, गोपनीय कागदपत्रे, काही आंतकवादी षड्यंत्रांची देवाण-घेवाण, अनेक अनभिज्ञ विषयांवर चालू असलेली चर्चा अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. यातील काही माहिती एवढी धक्कादायक स्वरूपाची असते की, असेही इंटरनेट जगतात चालू असते, यावर विश्वास बसणार नाही.
२. ही माहिती कशी पहातात ?
डार्क वेबमधील माहिती तशी पहाणे शक्य नसते; मात्र सध्या ‘टॉर’ (Tor)सारखे ‘ब्राऊझर’ वापरून डार्क वेबवर प्रवेश करणे शक्य असते; मात्र यामध्ये काही धोकेही असतात. ‘टॉर’सारखे ‘ब्राऊझर’चा उपयोग करून आपण जेव्हा डार्क वेबमधील माहितीचा शोध घेऊ लागतो, तेव्हा अनेक ‘व्हायरस’ अथवा अज्ञात धारिका आपल्या संगणकात नकळत ‘डाऊनलोड’ होऊ शकतात. या धारिका, म्हणजे वेगळे काही नसून, आपल्या संगणकातील माहितीची चोरी करण्यासाठी, धारिका नष्ट करण्यासाठी सिद्ध केलेले ‘प्रोग्रॅम’ असू शकतात, जाणीवपूर्वक सोडलेले व्हायरस असू शकतात, म्हणजे डार्क वेबमधील माहिती पहातांना धोकेही आहेत. येथे नेमके काय चालते ? हे पहाण्यासही जाणे, म्हणजे काही वेळा स्वत:चा संगणक आणि माहिती यांना अडचणीत आणण्यासारखे होते.
डार्क वेबचा उपयोग करणारे, म्हणजेच त्याचा स्वत:च्या गोपनीय वा अनधिकृत कामांसाठी उपयोग करणारे हे स्वत:ची ओळख लपवण्यासाठी, स्वत:ला लोकांच्या ‘सर्च’पासून अलिप्त ठेवण्यासाठीही संबंधित संगणकीय प्रणालींचा उपयोग करतात. ‘हॅकर’ही (माहितीची चोरी करणारे) या विश्वातच काम करत असतात, तेही दबा धरून बसलेले असतात, आपला संगणक आणि माहिती यांचा ताबा घ्यायला.
‘डिजिटल अरेस्ट’मधील (आभासी अटकेमधील) गुन्हेगार !
२२ डिसेंबरच्या लेखामध्ये आपण ‘डिजिटल अरेस्ट’ हा विषय वाचला. यामध्ये व्हिडिओ कॉल करणारे पोलीस, केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी यांची नावे घेणारे आणि तसा पोषाख करणार्या गुन्हेगारांना अटक का होत नाही ? असे काहींना वाटेल. याचे कारण, म्हणजे बहुतांश हे गुन्हेगार कंबोडिया, आखाती देश येथे बसून हे उद्योग करत आहेत, अशी संगणक तज्ञ जाणकरांची माहिती आहे. तेथूनच ते हे सर्व ‘नेटवर्क’ (यंत्रणा) हाताळत असल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या ते हाती लागत नाहीत. त्या देशांमध्ये जाऊन या गुन्हेगारांना जोपर्यंत पकडून भारतात आणून त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत ही समस्या मुळापासून संपणार नाही !
– श्री. यज्ञेश सावंत
३. अमेरिकेच्या सैन्याकडून निर्मिती
ऑनलाईन हत्या करण्यासाठी सुपारी देणे, खरेदी ड्रग्ज, मानवी अवयवांची तस्करी, बनावट (खोटे) पासपोर्ट सिद्ध करणे, असे प्रकार करत असतात. ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ (लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ) हा डार्क वेबवरील सामान्य भाग आहे. डार्क वेबची निर्मिती अमेरिकन सैन्याने केल्याचे म्हटले जाते. तज्ञांच्या मते जेव्हापासून इंटरनेट अस्तित्वात आले आहे, तेव्हापासून डार्क वेब कार्यरत आहे. अमेरिकेच्या सैन्याला स्वत:ची संकेतस्थळे, स्वत:ची माहिती लोकांपासून गुप्त ठेवायची होती, त्यांना नियमितचे संभाषण कुणाच्याही अध्यातमध्यात न येता करायचे होते; जगभरात पसरलेल्या अमेरिकन हेरांना अमेरिकेच्या सैन्यासमवेत नियमित संपर्कात रहाता यावे, चर्चा करता यावी, कामाचे आदेश देता यावेत, यादृष्टीने ‘टॉर’ ब्राऊझरची निर्मिती वर्ष १९९० च्या दशकात झाली. प्रारंभी केवळ अमेरिकन सैन्य आणि गुप्तहेर यांच्यापुरती असलेली ही संगणकीय प्रणाली नंतर सामान्य नागरिकांसाठी या दृष्टीने खुली करण्यात आली, जेणेकरून सामान्य नागरिकालाही गुप्तपणे, तसेच अज्ञात राहून त्याची गोपनीय कामे, कुठल्याही सर्च इंजिनच्या कक्षेत न येता करता यावीत. त्यामुळे नंतर याचा वापर सामान्य नागरिकांमध्येही चालू झाला. सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ही सुविधा खुली केली, असे अमेरिकी सैन्याचे म्हणणे असले, तरी त्यांचा उद्देश वेगळाच होता. अमेरिकन अधिकारी अथवा प्रशासनातील अधिकारी यांचे गुप्त संभाषण जरी एखाद्या हॅकरला सापडले, तरी ते नेमके कुणाचे आहे ? खरे कि खोटे आहे, याचा थांगपत्ता लागणार नाही.
आपल्याला सर्वांना आठवत असेल की, ऑस्ट्रेलियातील ज्युलिअन असांजे या संगणकतज्ञाने अमेरिकन अधिकारी, सैन्य यांचे जगभरातील देशांमधील त्यांच्या हेरांना पाठवलेले गोपनीय संदेश पकडले होते आणि ते त्याच्या ‘विकिलिक्स’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. अमेरिका नेमके काय काय ‘उद्योग’ जगामध्ये करत असते, याचा पर्दाफाशच असांजे यांनी हे संदेश पकडून केला होता. त्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेकडून कारवाई करण्याचा प्रयत्न झाला; मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
४. डार्क वेबचे धोके
डार्क वेबमध्ये माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवलेली असते. या ठिकाणी अज्ञातांकडून होणार्या चर्चांमध्ये बेकायदेशीर वस्तू आणि सेवांची खरेदी-विक्री होऊ शकते, शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, चोरीच्या क्रेडिट कार्डचा तपशील मिळवणे आणि इतर अवैध गोष्टींचा समावेश असतो. काही गोष्टींची भयावह चर्चा उदा. मानवी त्वचेची किंमत किती ? कुठून मिळेल ? मानवी अवयवांच्या तस्करीची चर्चा अशी पुष्कळ भयावह स्वरूपाचे विषय घेऊन चर्चा चालू असतात. कुणाचा ‘काटा’ काढण्याची चर्चा होते. त्यामुळे संकेतस्थळावरील या अज्ञात विश्वावर खरेतर बंदी घालायला पाहिजे; मात्र ती घातली जाणार नाही; कारण त्यामागे वर उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकेचे आणि अन्य काही पाश्चात्त्य देशांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यांचीच खरेतर या अज्ञात विश्वावर सत्ता आहे.
डार्क वेबचा अवैध गोष्टींसाठी, मानवी अवयवांची तस्करी यांसाठी उपयोग केला जात असला, तरी त्याचा लाभही सायबर पोलिसांना होतो. एखादे मोठे षड्यंत्र चालू असेल, मानवी तस्करीची चर्चा चालू असेल, कुणाला मारण्याची योजना चालू असेल, तर तज्ञ पोलीस या माहितीचा उपयोग करून संबंधित अवैध कृती रोखू शकतात आणि ती थांबवू शकतात. त्यामुळे डार्क वेबवर बंदी घातली जाणार नाही.
डार्क वेबचा गंमत म्हणूनही उपयोग करू नये आणि काहींना संगणक जाणणारे मित्रमंडळी, परिचित यांकडून या गोष्टींची माहिती मिळाली आणि जिज्ञासू म्हणून हे विश्व अनुभवयाचे असेल, तर वापरतांना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. येथे स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे आणि कोणत्याही बेकायदेशीर चर्चेत किंवा संशयास्पद गोष्टींमध्ये सहभागी होण्याचे टाळणे आवश्यक आहे.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल (२६.१२.२०२४)