लोकमान्य टिळक
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे धाकटे बंधू डॉ. सुहास आठवले यांनी शालेय जीवनात लिहिलेला निबंध
लोकमान्य टिळक
(जन्म १८५६- मृत्यू १९२०)
धवल यशाचा, अचल धृतीचा, देवात्मा जणु प्रज्ञेने ।
असे तिलक हा, दुजा हिमालय, दक्षिण भागी मानाने ।।
(ग्रंथ ‘राष्ट्रजनक टिळक’, लेखक : डी.एन्. शिखरे)
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच !’, या महामंत्राचे जनक लोकमान्य टिळक यांचा जन्म कोकणातील चिखलगाव या गावी २३ जुलै १८५६ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्यांचे पाळण्यातले नाव ‘बळवंत’ असले, तरी ‘बाळ’ हेच नाव सर्वांच्या मुखी रूढ झाले.
लोकमान्यांच्या पुढील आयुष्यात दृग्गोचर झालेले विद्वत्ता, धैर्य, हुशारी इत्यादी गुण त्यांच्यात बालपणांतच दिसून आले. ‘खाण तशी माती’ या म्हणीस बाळ टिळक अपवाद नव्हते. वडिलांप्रमाणेच त्यांचा गणित आणि संस्कृत या विषयांत हातखंडा होता. जे गणित सोडविण्याकरिता शिक्षकास कागदलेखणीची जरूरी वाटे, ते गणित टिळक तोंडीच सोडवत असत.
एकदा विद्यार्थी दशेत टिळकांनी ‘संत’ शब्द ‘संत’, ‘सन्त’ आणि ‘सन्त’ या तीन प्रकारे लिहिला. रुढीग्रस्त शिक्षकाने ‘संत’ शब्द बरोबर दिला आणि ‘बाकीचे दोन शब्द चूक आहेत’, असे सांगितले. शेवटी भांडण मुख्याध्यापकांकडे गेले. अर्थात त्यांनी निकाल टिळकांच्या बाजूने दिला. ही गोष्ट लहान असली, तरी टिळकांच्या स्वतंत्र बुद्धीची ती द्योतक आहे, हे खास !
वर्ष (इ.स.) १८७३ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘डेक्कन कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. तेथेही ते आपल्या बुद्धितेजाने चमकले. कॉलेजमध्ये शिकत असतांना शरीर आणि मन या दोन्हींच्याही सुदृढतेकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले. वर्ष (इ.स.) १८७९ मध्ये ते वकिलीची परीक्षा पास झाले.
त्यांनी इतर सर्वसामान्य पदवीधरांप्रमाणे सरकारी नोकरीचा मार्ग पत्करला असता तर गडगंज पैसा मिळविला असता; पण त्यांनी तो मार्ग पत्करला नाही. कारकून निर्माण करणारे त्या वेळचे शिक्षण त्यांना नापसंत होते; म्हणून त्यांनी आगरकर, चिपळूणकर इत्यादी पुढार्यांच्या साहाय्याने ‘न्यू इंग्लिश स्कूल’, ‘फर्ग्युसन कॉलेज’ या शिक्षणसंस्था स्थापून अल्प वेतनावर अध्यापकाचे अन् प्राध्यापकाचे कार्य केले. त्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रश्नास चालना दिली. डॉ. मरे मिचेल या मिशनर्याने ‘न्यू इंग्लिश हायस्कूल’ या शाळेविषयी काढलेल्या खालील उद्गारांवरून लोकमान्यांच्या शिक्षणकार्याची कल्पना येईल. डॉ. मरे मिचेल म्हणतात, ‘‘या शाळेचा उत्कर्ष पहाता मी असे खात्रीने म्हणू शकतो की, हिच्या तोडीची एकही शाळा मला सर्व हिंदुस्थानात दिसून आली नाही.’’
शालेय शिक्षणाइतकाच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा प्रश्न जो लोकशिक्षण, तो त्यांनी नंतर हाती घेतला. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या (वृत्त)पत्रांत राष्ट्रीय भावनेने रसरसलेले लेख लिहून त्यांनी जुलमी इंग्रजी राजवटीविरुद्ध जनतेच्या मनात चीड उत्पन्न केली. इंग्रज लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल याने तर त्या वेळी लोकमान्यांना ‘हिंदुस्थानातील अस्वस्थतेचे जनक’ (Father of Indian Unrest) म्हणून संबोधले. ‘धार्मिक आणि ऐतिहासिक उत्सवांना सार्वजनिक स्वरूप दिल्यास जनजागृती होईल’, ही मख्खी (मर्म) लोकमान्यांनी जाणली आणि त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंत्युत्सव यांना सार्वजनिक अन् व्यापक स्वरूप दिले.
हिंदी राष्ट्रीय सभा या राष्ट्रव्यापी संस्थेत शिरून तिला पूर्वीपेक्षा अधिक कार्यप्रवण आणि पुरोगामी बनविण्याचे कार्य टिळकांनीच केले. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही लोकमान्यांची चतुःसूत्री होती. त्यांनी त्यासाठी आतापर्यंत दोनदा तुरुंगवास भोगले.
राजद्रोहाच्या गंभीर आरोपाखाली १९०८ च्या जूनमध्ये त्यांना सरकारने सहा वर्षांची सजा ठोठावली. ही त्यांची पूर्वीपेक्षा मोठी अशी तिसरी शिक्षा (सजा) होय. रंगूनच्या तुरुंगात त्यांनी सहा वर्षांच्या अवधीत ‘गीतारहस्य’ हा भगवद्गीतेवरील स्पष्टीकरणात्मक ग्रंथ लिहीला.
‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४७) अर्थ : ‘तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही’, या महान कर्मयोगतत्त्वाचे रहस्य त्यांनी प्रस्तुत ग्रंथाद्वारे जगापुढे मांडले. ‘द ओरायन’ आणि ‘आर्क्टिक होम इन् दि वेदाज्’ या इंग्रजीत लिहिलेल्या विद्वत्तापूर्ण ग्रंथात लोकमान्यांची संशोधनात्मक बुद्धी चांगल्या रितीने प्रगट झाली.
या महान नेत्याचा अंत (निधन) १९२० च्या जुलैच्या ३१ तारखेस रात्री १ वाजता झाला. वक्तृत्व, लेखनपटुत्व, देशभक्ती, संघटनचातुर्य इत्यादी अनेक गुणांचा समन्वय लोकमान्यांच्या ठिकाणी झाला होता. त्यांचे अर्धवट राहिलेले स्वराज्य-संपादनाचे कार्य त्यांच्या मृत्यूनंतर देशभक्तांनी पूर्ण केले.’
– सुहास बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लहान बंधू