साईबाबा संस्थानमध्ये बनावट दर्शन पास सिद्ध करणारा कर्मचारी सागर आव्हाडवर गुन्हा नोंद !

शिर्डी – श्री साईबाबा संस्थानमध्ये मुंबई येथील ‘बेटर कम्युनिकेशन लि.’ या आस्थापनात काम करणार्‍या सागर आव्हाड या कर्मचार्‍याने भाविकांना दर्शनासाठी वितरित केला जाणारा बनावट पास सिद्ध केला. हा पास घेऊन तो त्याच्या ओळखीच्या भाविकांना घेऊन गेट क्रमांक ४ वर आला असता तेथील सुरक्षा कर्मचार्‍यांना हा पास बनावट असल्याचा संशय आला. ही माहिती सुरक्षारक्षकांनी वरिष्ठांना देताच आव्हाड याने तो पास फाडला आणि तेथून पळून गेला. यानंतर साई संस्थान प्रशासनाने त्याला निलंबित केले. या घटनेनंतर प्रशासनाने नोंदवलेल्या तक्रारीनंतर सागर याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी सागर याने संगणकाच्या आधारे बनावट पास सिद्ध करून तो भाविकांना विकला होता; मात्र पास पडताळणी केंद्रावरच तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सागर याने फाडून टाकलेला पास साई संस्थानच्या संगणक विभागाने एकत्र जोडून तो पडताळल्यावर तो पास बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणी सागरने यापूर्वी असे काही बनावट पास सिद्ध करून भाविकांना विकले होते का ? यात आणखी कुणाचा सहभाग आहे का ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.