SANATAN PRABHAT EXCLUSIVE : ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ कक्षात होणार आमूलाग्र पालट !
प्रत्येक रुग्णाची शासन माहिती घेणार !
श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई
मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्ष’ आधुनिक पद्धतीने कार्यरत करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षा’चे प्रमुख डॉ. रामेश्वर नाईक यांच्या नेतृत्वाखाली या कक्षाचे सर्व पदाधिकारी वेगाने कामाला लागले आहेत. लवकरच या कक्षाशी जोडलेल्या राज्यातील प्रत्येक रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची माहिती घेणारी ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ कार्यरत केली जाणार आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचे आधुनिकीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांवरील उपचारासाठी सर्वाधिक निधी व्यय करण्याचा विक्रम स्थापित केला होता. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या कक्षातून अधिकाधिक अर्थसाहाय्य देण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भर दिला जाणार आहे. सध्या मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षातून अर्थसाहाय्य मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यात वेळ लागतो. रुग्णाला तातडीच्या उपचारांची आवश्यकता रुग्णाचे नातेवाइकांनाही त्याकडे लक्ष देणे अपरिहार्य असते. अशा वेळी कागदपत्रांची जमवाजमव करण्याला विलंब होता. त्याचा परिणाम रुग्णांना अर्थसाहाय्य मिळण्यासही विलंब होतो. त्यात उत्पन्नाचा दाखला, रुग्णालयाचे प्रमाणपत्र, व्ययाचा तपशील ही सर्व कागदपत्रे जमा करण्यात विलंब लागतो. अनेकदा निधी मिळेपर्यंत रुग्णावरील उपचार पूर्ण होतात. त्यामुळे रुग्णांना निधी प्राप्त होत नाही. यावर उपाय म्हणून रुग्णांची ही सर्व माहिती संबंधित रुग्णालयाकडे उपलब्ध असणार आहे. रुग्णालयातूनच ही माहिती ऑनलाईन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
सामाजिक कार्य निधी उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न होणार !
विविध व्यावसायिक आस्थापनांकडून सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा निधी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाला प्राप्त व्हावा, यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यातून अधिकाधिक गरीब रुग्णांना उपचार मिळावे, या उद्देशाने विविध आस्थापनांशी संपर्क करण्यावरही मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षाकडून भर दिला जाणार आहे.
‘ट्रॅकिंग सिस्टिम’द्वारे प्रत्येक रुग्णाची माहिती घेणार !
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षातून निधी प्राप्त झालेल्या प्रत्येक रुग्णावर कोणते उपचार करण्यात आले, तसेच त्यांना रुग्णालयातून कधी सोडण्यात आले, या सर्वांची माहिती घेण्याची ‘ट्रॅकिंग सिस्टिम’ या कक्षातून चालू करण्यात येणार आहे. यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाशी जोडलेल्या प्रत्येक रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाची ऑनलाईन माहिती या कक्षाकडे उपलब्ध असणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या या आधुनिकीकरणामुळे रुग्णाला वैद्यकीय साहाय्यता तत्परतेने उपलब्ध होणे, रुग्णालयांतून होणार्या आर्थिक लुटीला पायबंद बसणे आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्ण अन् त्यांचे नातेवाईक यांना होणारा त्रास वाचणे असे लाभ आर्थिक दुर्लक्ष नागरिकांना होणार आहेत. यातून भविष्यात मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षातून अधिकाधिक लाभ रुग्णांना प्राप्त होऊ शकेल.