धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम यांना साजेसे स्मारक साकारू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
विद्यापीठ दर्जाचे प्रशिक्षण केंद्र व्हावे, अशी मिलिंद एकबोटे यांची मागणी !
कोरेगाव भीमा – स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची बलीदान भूमी असलेल्या श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे छत्रपतींचे ऐतिहासिक संदर्भ, प्राचीन वास्तूरचना आणि आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालू. राजाचे शौर्य आणि पराक्रम यांना साजेसे जागतिक दर्जाचे स्मारक साकारू, तसेच कामाच्या प्रस्तावास बैठक घेऊन त्वरित मान्यता देऊ. या कामांचे सविस्तर आराखडे आणि अंदाजपत्रक सिद्ध करून त्याची निविदा काढण्याची कार्यवाही करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकार्यांना दिल्या. ते श्रीक्षेत्र तुळापूर येथे शिरूर-हवेली मतदारसंघातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाची पहाणी करतांना बोलत होते.
स्मृती समितीचे कार्यवाहक मिलिंद एकबोटे यांनी शिव-शंभूची शौर्य कला प्रचलित व्हावी, यासाठी विद्यापीठ दर्जाचे प्रशिक्षण केंद्र व्हावे, अशी मागणी केली आहे. श्रीक्षेत्र वढू बुद्रूक येथील समाधी स्थळावर ‘धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती’कडून ९ कोटी रुपयांचे तटबंदी, बुरुज, सभागृह, मेघडंबरीचे बांधकाम केले आहे, असेही त्यांनी सांगितले.