संपादकीय : मुळाकडे परतावेच !
गायिका देवी यांनी बिहारमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहनदास गांधी यांनी प्रचलित केलेले ‘रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम…’ हे गीत गायले आणि उपस्थितांपैकी काहींनी त्यावर आक्षेप घेतला. आक्षेप घेणार्यांनी ‘रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम, सुंदर विग्रह मेघश्याम, गंगा तुलसी शालिग्राम…’ हे मूळ भजन गाण्याची मागणी केली. या घटनेनंतर पुन्हा एकदा ‘समाजाची सहिष्णुता अल्प झाली आहे का ?’, ‘समाजात असंतोष निर्माण झाला आहे’ आदी वावड्या उठवायला डाव्यांना संधी मिळाली.
मूळ गाणे म्हणायला सांगणे, हा काही अपराध आहे का ? मुळातच गांधी यांच्या तत्त्वांविषयी भारतियांमध्ये एकमत नाही. मोहनदास गांधी हे भारताच्या खंडतेला कारणीभूत असल्याचे बरेच पुरावे अनेकांनी पुष्कळ वेळा सादर केले आहेत. भारतमातेला स्वातंत्र्य देणार्यांमध्ये मो. गांधी यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाण्यामागे डाव्यांचा कुटील डाव भारतियांपासून आता लपून राहिलेला नाही. पहिल्या पंतप्रधानांच्या स्वार्थी मनोवृत्तीने भारताचा झालेला र्हास भारतियांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि भोगलाही आहे. त्यामुळेच आता कुणी भारतीय समाजाला असहिष्णु म्हणत असेल, तर ती त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच आहे. काही ना काही कारण काढून भारतियांची बुद्धी भ्रष्ट करू पहाणार्यांनी स्वतःत सद्सद्विवेकबुद्धी नावाला तरी शिल्लक राहिली आहे का ? हे आधी पडताळले पाहिजे. त्याचप्रमाणे वारंवार भारतीय आणि हिंदू यांना सहिष्णुतेचा उपदेश देणेही आता बंद करावे; कारण ज्याप्रमाणे नावाला उरलेली काँग्रेस आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्याचप्रमाणे डाव्यांचीही गत निश्चितपणे होईल. कोणतीही खुसपट काढून भारतियांना आणि त्यातल्या त्यात हिंदूंना ‘वसुधैव कुटुंबकम्’चा अर्थ शिकवणे आता तात्काळ बंद झालेच पाहिजे. यासाठी हिंदूंनी जगजागृती आणि संघटन यांचे कार्य तीव्र गतीने वाढवणे आवश्यक आहे.
अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आहेत. या सोहळ्याला जे जे उपस्थित राहिले किंवा ज्यांनी ज्यांनी रामलल्लाचे ‘ऑनलाईन’ दर्शन घेतले, अशा प्रत्येक हिंदूचे आणि मनाने हिंदु असलेल्या प्रत्येकाचे अंतःकरण भरून आलेले संपूर्ण विश्वाने पाहिले आहे. त्या रामलल्लाचीच ही लीला आहे, ज्यामुळे आता भारतियांना खरे-खोटे स्पष्टपणे दिसू लागले आहे आणि ते योग्य त्याचाच आग्रह करत आहेत. ही तर केवळ भारतियांना स्वतःच्या संपन्नतेची दिसलेली चुणूक आहे. प्रत्यक्ष रामराज्य म्हणजेच भारत हिंदु राष्ट्र होईल, त्या वेळी डावे केवळ इतिहासात आढळतील, हे नक्की !
भारत हिंदु राष्ट्र होईल, त्या वेळी डावे केवळ इतिहासात आढळतील, हे नक्की ! |