संपादकीय : मनमोहन सिंह यांचे निधन !
अर्थतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ‘पदवी’संपन्न, अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले डॉ. सिंह हे अर्थतज्ञ म्हणून जितके प्रसिद्ध होते, तितकेच ‘मौनी पंतप्रधान’ म्हणूनही ! अखंड भारतात जन्मलेले डॉ. सिंह उच्चविद्याविभूषित आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित होते. व्यक्तीगत जीवनात अत्यंत काटकसरी असलेले डॉ. सिंह यांचा पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मोठा होता, यात वाद नाही. भारताच्या सेवेसाठी त्यांनी केलेले कार्य आणि निर्णय कौतुकास्पद आहेत, त्यांनी भारतासाठी अर्थमंत्री आणि अर्थतज्ञ म्हणून घेतलेले निर्णय भारताच्या इतिहासात नोंद झाले आहेत; पण भारतियांना नेहमीच खटकले ते त्यांचे मौन !
त्यांच्या योग्यतेचा सन्मान कधी काँग्रेसने केला नाहीच, तर केवळ ‘संधी’ म्हणून सातत्याने त्यांचा वापर केला. मुळातच शांत असलेले मनमोहन सिंह यांच्या सौम्यतेचा खरा अपलाभ उठवला, तो सोनिया गांधी यांनी ! सोनिया गांधी यांना निवडणुकीत यश मिळवूनही त्यांच्या राष्ट्रीयत्वामुळे पंतप्रधान बनता आले नव्हते. त्या परिस्थितीत सोनिया गांधी यांनी नाईलाजाने मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपद दिले आणि ते अपघाताने पंतप्रधान बनले. पंतप्रधान म्हणून जरी नाव डॉ. सिंह यांचे होते; परंतु भारत देश कोण चालवत होते ? आणि कोण भारताला अधोगतीला नेत होते ? ते देश जाणून होता. परराष्ट्र व्यवहाराच्या वेळी भारताचे प्रमुख असलेले डॉ. सिंह यांना बाजूला करून स्वतः पुढेपुढे करणार्या सोनिया गांधी यांनी केवळ डॉ. सिंह यांचाच नव्हे, तर भारताच्या पंतप्रधानपदाचा सातत्याने अपमान केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार झालेला अपमान भारतियांना सहन करावा लागला होता. स्वपक्षातील घोटाळेखोरांविरुद्ध मौनात राहिलेले मनमोहन सिंह यांनी स्वतःच्या मौनाची परिसीमा दाखवून दिली होती. पंतप्रधान पदावरील व्यक्ती पक्षीय वर्चस्वापुढे किती हतबल होऊ शकते ?, याचे उदाहरण म्हणजे मनमोहन सिंह यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाल !
भारताचा अमेरिकेसमवेत झालेला अणूऊर्जा करार हे मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीतील मोठे यश मानले जाते. या करारामुळे अणूऊर्जेच्या पातळीवर एकट्या पडलेल्या भारताला अमेरिकेच्या आण्विक तंत्रज्ञानाची दारे खुली झाली होती; मात्र मनमोहन सिंह यांच्या सरकारला या कराराची किंमत मोजावी लागली. त्या वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने या अणूकराराच्या विरोधात निदर्शने करून सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्या वेळी सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसला दुसर्या एका पक्षाचा पाठिंबा मिळवावा लागला होता. त्यातून काँग्रेसवर खासदारांची मते विकत घेतल्याचा आरोप झाला होता.
डॉ. मनमोहन सिंह यांचे काँग्रेसींसह इतरांशी अत्यंत स्नेहाचे संबंध ! अतीव पुत्रप्रेमापोटी पांडवांना त्यांचा योग्य तो हक्क देण्यास असाहाय्य ठरलेला धृतराष्ट्र आणि काँग्रेसींच्या प्रेमापोटी त्यांच्या पापाबद्दल ‘अंध’ अन् गप्प राहिलेले डॉ. सिंह यांच्यात भेद आहे का ? काँग्रेसच्या मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी ‘भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे’, असे पंतप्रधान डॉ. सिंह यांनी सांगितल्यानंतर मुसलमानांच्या अनेक कारवायांना मुक्त हस्त मिळाला. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आणि हिंदु बहुसंख्य असलेल्या अन् सर्वांना सामावून घेणार्या हिंदूंबद्दल अन् अन्य धर्मियांविषयी असा आपपरभाव ‘पंतप्रधान’ असलेल्या व्यक्तीने करावा, हा भारतियांवर झालेला मोठा आघात होता. देशाच्या पंतप्रधानांवर निर्भर रहाणार्या हिंदूंना एक झटकाच या विधानामुळे मिळाला. ‘जे होते ते चांगल्यासाठीच’, या उक्तीनुसार त्याच वेळी हिंदूंना ‘त्यांचे कुणी नाही’, हे स्पष्टपणे उमगले आणि पुढचा घटनाक्रम आपण जाणतोच. वाईटातूनही चांगले होते, हे काळाने दाखवून दिले आणि वर्ष २०१४ पासून आतापर्यंत काँग्रेस शिल्लक राहिलेली नाही. येथून पुढेही ‘गांधी’ नसलेले घराणे आणि त्यांचे चेले यांना नाईलाजास्तव राजकारणात रहावे लागेल, याची सोय भारतियांनी करून ठेवलेलीच आहे. कदाचित् व्यक्ती म्हणून थोडेतरी चांगले असलेल्या डॉ. सिंह यांचा काँग्रेसने केलेल्या वापराचा काळाने घेतलेला हा ‘बदला’ म्हणावा का ? असो.