सृष्टीरचनेच्या प्रक्रियेविषयी अंबरनाथ (ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

‘लहानपणापासून माझ्या मनात पुढील प्रश्न यायचे, ‘या जगात पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि तारे नसते, तर काय झाले असते ? ही सृष्टी कशी बनली असेल? जेव्हा काहीच नव्हते, तेव्हा जगाची स्थिती कशी होती ? पृथ्वी बनवतांना कोणी साहाय्य केले असेल? तिच्या रचनेचा पाया काय असेल ?’ त्या प्रश्नांची उत्तरे मला कधी मिळाली नाहीत; पण तेव्हापासून अधूनमधून ते प्रश्न माझ्या मनात घोळत असायचे. २.३.२०२३ या दिवशी मध्यरात्री २.३० वाजता ‘सृष्टी कशी निर्माण झाली ?’, याविषयीची सूक्ष्मातील काही दृश्ये देवाने मला दाखवली. 

१. शक्तितत्त्वातून सृष्टीरचनेची प्रक्रिया चालू होणे  

ब्रह्मांडनिर्मितीच्या वेळी शक्तितत्त्व अस्तित्वात होते. ते द्रवरूपात वहात होते. शक्तितत्त्वाला स्वतःचे मन, बुद्धी आणि शक्ती होती. शक्तितत्त्व प्रवाहित होत असतांना त्याच्या मनात सृष्टीरचनेची कल्पना आली. शक्तितत्त्वाचा संकल्प झाला. शक्तितत्त्वाने स्वतःला स्त्रीरूपात मूर्त केले. पुढच्या टप्प्यात शक्तितत्त्वाने स्वतःचे आत्मसामर्थ्य आणि तपःसामर्थ्य यांच्या बळावर आज्ञाचक्र, अनाहतचक्र अन् मणिपूरचक्र यांतून तीन पुरुषतत्त्वांत स्वतःची शक्ती विभाजित केली. त्यांना पुरुषांचे मूर्त रूप दिले. शक्तितत्त्वाने त्या तीन पुरुषांना ब्रह्मांडनिर्मिती आणि सृष्टीरचना या कार्यात साहाय्य करण्याचे आवाहन केले. त्यांतील आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांतून निर्मित पुरुषांनी मातृत्व स्वीकारून सृष्टीनिर्मितीत साहाय्य करण्यास नकार दिला; पण मणिपूरचक्रातून निर्माण झालेल्या पुरुषाने शक्तितत्त्वाला सृष्टीनिर्मितीत साहाय्य करण्याचे वचन दिले आणि सृष्टीरचनेची प्रक्रिया चालू झाली.

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

२. सृष्टीरचनेचे नियम 

अ. सृष्टीनिर्मितीची मुख्य देवता ‘आदिशक्ती’ ही आहे.

आ. मणिपूरचक्रस्थित शक्तितत्त्वरूपी पुरुषाचे नाव ‘शिव’, असे ठेवण्यात आले. ‘शिव’ या शब्दाचा अर्थ ‘सर्वश्रेष्ठ’, असा आहे.

इ. शिवाने ब्रह्माडांची निर्मिती केली. तेव्हा उत्पन्न झालेल्या जिवांना ‘जीव’, असे संबोधले गेले; म्हणून ‘जीव आणि शिव यांचे मीलन’, असा शब्दप्रयोग प्रचलित झाला.

ई. सृष्टीसंचलनासाठी शक्तितत्त्वाने देवीस्वरूप धारण केले. सृष्टीरचनेच्या काळात प्रत्येक वेळी तिने शिवाशी एकरूप होऊन रचनेच्या कार्यात साहाय्य केले आहे.

उ. आदिशक्ती स्वस्वरूपा, सर्वशक्तीमान आणि सामर्थ्यशाली आहे. ती ब्रह्मांडरचनेत शक्तितत्त्वाच्या शिवरूपाला प्राधान्य देऊन त्याच्या सेवेत सहचारिणी म्हणून सहभागी होते.

ऊ. या सृष्टीचा त्रिकालबाधित नियम आहे, ‘जे आपण देऊ, ते न्यून होणार नाही, तर त्यात दुप्पट वाढ होणार.’

ए. सृष्टीची निर्मिती आणि संचलन यांसाठी आवश्यक असलेले शक्तीसामर्थ्य शक्तितत्त्वाने शिवाला प्रदान केले. शिव हा सृष्टीरचनेचा रचयिता आहे; पण ‘सृष्टीचा मूळ पाया शक्तितत्त्व हा आहे’, हे विसरून चालणार नाही.

३. सृष्टीची प्रत्यक्ष रचना

३ अ. पृथ्वी हे शक्तितत्त्वाच्या अस्तित्वाचे प्रतीक असणे : ‘सर्व ब्रह्मांडात पृथ्वी हा मुख्य लोक आहे’, असे धरून सप्तलोक आणि पृथ्वीच्या खाली सप्तपातळे बनवण्यात आली. पृथ्वी हे शक्तितत्त्वाच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे. शक्तितत्त्व हे द्रवरूप असल्याने पृथ्वीवर ७१ टक्के पाणी आणि २९ टक्के भूभाग आहे. तिला शक्तितत्त्ववाचक संबोधले जाते; म्हणून ‘ती पृथ्वी’, असे म्हणतात. कालानुरूप तिला ‘धरणीमाता’, असे नाव पडले आहे.

३ आ. पुरुष आणि प्रकृती हे शक्तितत्त्वाने निर्माण केलेले घटक असणे : जिवांची निर्मिती करतांना ८४ लक्ष योनींची रचना करण्यात आली, म्हणजे ८४ लक्ष प्रकारचे जीव निर्माण करण्यात आले. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, म्हणजे ब्रह्मांडाच्या रचनेप्रमाणेच मनुष्याच्या शरिराची रचना करण्यात आली. इथे स्त्री-पुरुष असा भेद नाही; कारण मुळात शक्ति हे तत्त्व आहे. पुरुष आणि प्रकृती हे शक्तितत्त्वाने निर्माण केलेले घटक आहेत. बर्‍याचदा प्रश्न विचारला जातो, ‘प्रथम पुरुष निर्माण झाला कि स्त्री ?’ त्याचे उत्तर आहे, ‘शक्तितत्त्वाचे स्त्री आणि पुरुष असे अविभाज्य घटक आहेत. ते अनुक्रमे ऊर्जाशक्ती आणि क्रियाशक्ती यांसाठी कार्यरत आहेत.’

४. शक्तितत्त्वातून स्त्री आणि  पुरुष या घटकांच्या निर्मितीचा उद्देश 

अ. सृष्टीचे त्रिकालाबाधित आणि आदर्श संचालन करणे.

आ. आनंदप्राप्तीसह मूळ स्वरूपाला प्राप्त होणे.

५. सृष्टीरचनेचा मूळ गाभा ‘आनंदप्राप्ती’, हा आहे. आनंद हा अविनाशी, चिरंतन, सत्य आणि त्रिकालाबाधित आहे अन् तोच मनुष्यजीवनाचा मुख्य पाया अन् ध्येय आहे.

‘हे भगवंता, ‘या लिखाणातील सर्व अहंकार नष्ट होऊ दे. यातून माझी साधना होऊ दे. हे भगवंता, तुझ्या प्राप्तीसाठी जे आवश्यक आहे, ते मला कृतीत आणता येऊ दे आणि तुझ्या प्राप्तीत जे अडथळे आहेत, ते दूर कर’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (३.२.२०२४)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक