खोट्या कागदपत्रांद्वारे ‘झोपू’ योजनेत पुन्हा घर मिळवणार्यांवर कारवाई !
मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एकदा घर मिळाल्यावर खोट्या कागदपत्रांद्वारे पुन्हा घर मिळवणार्या ६ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सक्षम प्राधिकारी (तीन) डॉ. मोहन नळदकर यांनी दिली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एकदा घर मिळाल्यानंतर संबंधित झोपडपट्टीवासीय पुन्हा घर मिळण्यास पात्र ठरत नाहीत. अंधेरी पश्चिम येथील श्रीरामवाडी गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील सक्षम प्राधिकार्यांनी अशा घर मिळालेल्या २१ जणांना पात्र केले होते. यासंदर्भात याच योजनेतील जागरूक झोपडपट्टीवासियांनी माहिती अधिकारात माहिती घेतली. यामध्ये जिवंत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आदी बोगस असल्याचे तक्रारदारांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले. सक्षम प्राधिकारी कोष्टी यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये २१ जणांची पात्रता रहित केली; मात्र त्यांना वितरित झालेल्या सदनिका प्राधिकरणाने अद्याप कह्यात घेतल्या नाहीत. त्यातच आता आणखी ६ जणांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे.