व्यक्तीला येणारा तणाव आणि वैद्यकीय दृष्टीकोनातून ध्यानामुळे होणारे लाभ !
‘काही विकार न उद्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘जीवनातील तणाव देहक्रियांवर कसा परिणाम करतो ? आणि त्यातून नंतर विकार कसे उद्भवतात ?’ अन् ‘ध्यानामुळे त्यावर नेमका कसा उपाय होतो ?’, हे समजून घेतले, तर ध्यान परिणामकारक होण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करू. या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्टीने ध्यानाचे लाभ’ यांविषयी थोडक्यात जाणून घेऊया. २१ डिसेंबर या ‘जागतिक ध्यान दिना’च्या दिवशीपासून प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्टीने ध्यानाचे लाभ, तणावाला प्रतिसाद देणारी शरीरक्रियेची अंगे अणि त्यांची वैशिष्ट्ये, दीघर्कालीन तणावामुळे तणाव प्रतिसादाची वारंवारता वाढून आजार होणे, तसेच वर्तमान तणावाची स्थिती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ५)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/866831.html
६. ध्यानामुळे शरीरक्रियांवर होणारे परिणाम
अ. ‘ध्यानामुळे परासंवेदनात्मक (पॅरासिंपथॅटिक) स्वायत्त संस्था सक्रीय होते. तिचे कार्य आपण आधी पाहिले आहे. ध्यानामुळे या चेतासंस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक, म्हणजे ‘व्हीगस नर्व्ह’ (टीप) सक्रीय होते. या स्वायत्त चेतासंस्थेच्या सक्रियतेमुळे ‘रक्तदाब न्यून होणे, हृदयाची गती न्यून होणे, पचनक्रिया सुधारणे’, यांसारख्या शारीरिक क्रिया घडतात.
टीप – व्हीगस नर्व्ह : ही परासंवेदनात्मक (पॅरासिंपथॅटिक) स्वायत्त चेतासंस्थेतील एक महत्त्वाची नस आहे. मेंदूपासून चालू होऊन ती शरिरातील हृदय, श्वासपटल, अशा विविध महत्त्वाच्या इंद्रियांना मेंदूपासून निघणारे संकेत पोचवते. तिच्या माध्यमातून हृदयाची गती आणि श्वसनक्रिया यांवर नियंत्रण ठेवले जाते.
आ. ध्यानामुळे सहानुभूती (सिंपथॅटिक) स्वायत्त चेतासंस्थेची सक्रीयता न्यून होते. स्वाभाविकच त्यामुळे होत असलेले ‘रक्तदाब वाढणे, हृदयाची गती वाढणे’, यांसारखे दुष्परिणाम न्यून होतात.
इ. ध्यानामुळे एक प्रकारचा विशेष शांतपणा आणि आरोग्याला उपकारक असा सैलपणा देहात येतो.
ई. ध्यानामुळे मेंदूतील संदेशवहनासाठी उपयोगात येणार्या द्रव्यांमध्ये पालट होतो, उदा. ‘सेरोटोनिन’नामक द्रव्याची मेंदूतील मात्रा वाढते. त्यामुळे मेंदूत शांतपणाची भावना निर्माण होते. ‘सिरोटोनिन’ या द्रव्याच्या गुणधर्माचा उपयोग काही मानसिक आजारांवरील औषधयोजनेमध्ये केला जातो. अशा आजारांच्या संदर्भात वापरल्या जाणार्या काही औषधांमुळे सिरोटोनिनची मेंदूतील मात्रा चांगली राखली जाते.
७. ध्यानामुळे काही प्रमाणात बरे होऊ शकणारे आजार
७ अ. आजारांची सूची वाचण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना
१. पुढे दिलेल्या सूचीतील आजारांवर ‘ध्यान’ ही पूर्ण बरी करणारी उपाययोजना नव्हे.
२. या आजारांच्या उपचाराच्या दृष्टीने ध्यान न्यूनाधिक प्रमाणात साहाय्य करते.
३. व्यक्तीपरत्वे हा प्रभाव भिन्न असू शकतो. त्याचप्रमाणे आजाराच्या अवस्थेनुसारही हा प्रभाव भिन्न असतो.
४. या प्रकारचे आजार असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय मार्गदर्शनानुसार आजारांवर उपाययोजना करावी.
७ आ. आजार
७ आ १. शारीरिक आजार : हृदयविकार, उच्च रक्तदाब, जुनाट शारीरिक वेदना, ‘इरीटेबल बावेल सिंड्रोम (शौचाविषयीच्या समस्या), तसेच ऊतींमधील दीर्घकालीन सुजेमुळे (क्रोनिक इन्फ्लमेशनमुळे) होणारे स्वयंप्रतिकार आजार (आटोइम्यून डिसीजेस्), उदा. संधिवात, सोरायसिस.
७ आ २. मानसिक आजार : उदासीनतेसारखे द्विध्रुवीय भावनिक आजार, ‘पॅनिक’, पुनःपुन्हा तीच कृती करत रहाणे (आब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर), तीव्र आघात पश्चात् मानसिक समस्या (पोस्ट ट्रोमाटिक स्ट्रेस डिसॉर्डर), व्यसनाधीनता इत्यादी.
८. सामान्य स्वास्थ्यासाठी ध्यान
वरील विवरणातून लक्षात आले असेल की, ध्यान हे अनेक आरोग्यदायी लाभ देणारे, तसेच तणावापासून मुक्त होण्याचे आणि जीवनशैली निरोगी राखण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. सरावाने ध्यान हे अधिक सोपे आणि प्रभावी बनते; कारण ते कालांतराने तणावाला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवते.
९. सामान्य जीवनात ध्यानाचा परिणाम
ध्यान हे मनासाठी स्नानाप्रमाणे आहे. आपले मन फलकासारखे आहे. आपल्याला कळत-नकळत प्राप्त होणारी प्रत्येक संवेदना आणि जमा झालेल्या स्मृती मनाच्या पटलावर सतत काहीतरी लिहीत असतात. शेवटी हा फलक गर्दी आणि गोंधळ यांमुळे अव्यवस्थित होतो. काहीही समजून घेणे कठीण होत जाते. हा ताण आपल्याला आणखी थकवतो, आपली एकाग्रता न्यून करतो, आपल्या कल्पनाशक्तीवर परिणाम करतो आणि आपले विचार मंदावतो. यावर ध्यान हे एका ‘डस्टर’सारखे (फलक पुसण्याच्या कापडासारखे) काम करते. ते हा फलक स्वच्छ करते, आपल्याला ताजेतवाने करते आणि पुन्हा पुढच्या दिवसासाठी सिद्धता करते. ध्यान नियमितपणे करत राहिल्यास हळूहळू एकाग्रता आणि कल्पनाशक्ती सुधारते, तसेच बुद्धी प्रौढ होण्यास साहाय्य होते.
१०. कृतज्ञता
या लेखासाठी मला माझे वैद्यकीय क्षेत्रातील एक शिक्षक डॉ. मिलिंद पटवर्धनलिखित ‘डिस्ट्रेस टू डी-स्ट्रेस’ या पुस्तकाचा, तसेच माहितीजालावर (इंटरनेटवर) माहिती उपलब्ध करून देणार्या संशोधकांचा आधार मिळाला.’
(समाप्त)
।। श्री गुरुचरणार्पणमस्तु ।।
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०२४)