भाविकांच्या सोयीसाठी ग्रामस्थांनी केली रस्त्याची साफसफाई
दोडामार्ग – तालुक्यातील शिरवल, केर, भेकुर्ली रस्त्याच्या दुतर्फा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडी, झुडपे वाढली होती. दुचाकी घेऊन जाणेही कठीण बनले होते. गावातील ग्रामस्थांनी ही झाडी तोडून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली होती; मात्र प्रशासनाकडून कार्यवाही होईल याची वाट न बघता केर गावात असलेल्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्वत:च पुढाकार घेऊन २५ डिसेंबरला श्रमदान करून झाडी तोडून परिसराची साफसफाई केली. या कामात निडलीवासियांनी पुढाकार घेऊन शिरवलमार्गे येणार्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून श्रमदान केले.
गुळदुवे येथे ग्रामस्थांनी श्रमदान करून नदीचे पात्र मोकळे केली
दुसर्या घटनेत सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-गुळदुवे येथे नदीच्या पात्रात वाढलेली झाडी ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवून तोडली आणि नदीचे पात्र मोकळे केले.
नदीच्या पात्रात झाडी वाढल्याने पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो. अतीवृष्टी झाल्यास पूर येऊन या पुराचे पाणी येथील शेतीत घुसते. त्यामुळे शेतकर्यांची हानी होते. नदीचे पात्र मोकळे करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली; मात्र कोणतीही उपायोजना न करण्यात आल्याने अखेर ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वत:च कृती केली.