‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषणाचे नियम मोडल्यास कारवाई करण्याचे दायित्व पोलिसांचे ! – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ
पणजी, २५ डिसेंबर (वार्ता.) – धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार्या ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल’मध्ये होणार्या ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४ पथके सिद्ध केली आहेत. तसेच नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ ठिकठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणीही ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंत्रे बसवली आहेत. एखाद्या ठिकाणी ध्वनीप्रदूषण होत असेल, तर ते रोखण्याचे दायित्व पोलिसांचे आहे, अशी माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आहे.
४ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत संगीत पार्ट्यांमध्ये ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती
२४ ते २६ डिसेंबर, तसेच ३१ डिसेंबर या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत संगीत पार्ट्यांमध्ये ध्वनीक्षेपक लावण्यास अनुमती देण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि पर्यटन या दोन्हींचा समतोल साधण्यासाठी पर्यावरण अन् हवामान पालट विभागाने हा निर्णय घेतला आहे. या वेळी नियमांचे पालन होत आहे कि नाही ?, हे पडताळण्यासाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.