गोव्यात ‘सन, सी अँड सँड’ ऐवजी आध्यात्मिक आणि मंदिर संस्कृती यांना प्रोत्साहन दिले ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

(‘सन, सी अँड सँड’ म्हणजे सुमद्रकिनार्‍यावरील पर्यटन)

पणजी, २५ डिसेंबर (वार्ता.) – पोर्तुगिजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले. देशात धर्मांतराचे प्रकार सर्वाधिक गोव्यातच झाले आहेत. गोव्यातच सर्वाधिक मंदिरे नष्ट करण्यात आली, तरीही येथील पूर्वजांनी गोव्याचा सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवला आहे. आजही ही संस्कृती गोव्यात अबाधित आहे. गोवा सरकारने ‘सन, सी अँड सँड’ ऐवजी आध्यात्मिक आणि मंदिर संस्कृती यांना प्रोत्साहन दिले आहे, असे उद्गार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. गोव्यात ‘पांचजन्य’च्या ‘सागर मंथन’ संवाद कार्यक्रमात ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील उद्गार काढले.

गोवा राज्य हे देशातील पर्यटनाची राजधानी !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोवा राज्य हे देशातील पर्यटनाची राजधानी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने गोव्याची स्पर्धा श्रीलंका, मालदिव यांसारख्या देशांशी आहे. गोव्यात सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न आहे. सरकार हा प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गोव्यात भ्रमणभाषवरील ‘अ‍ॅप’वर आधारित ‘गोवा माईल्स’ ही टॅक्सीसेवा, तसेच ‘प्रीपेड’ टॅक्सीसेवा उपलब्ध आहे’’.

५० वर्षांत शक्य न झालेल्या साधनसुविधा मागील १० वर्षांमध्ये उपलब्ध केल्या !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,‘‘गोव्यात मागील ५० वर्षांत ज्या साधनसुविधा उपलब्ध केल्या गेल्या नाहीत, त्या मागील १० वर्षांमध्ये उपलब्ध केल्या आहेत. गोव्यात गेल्या १० वर्षांत गाव आणि व्यक्ती यांचा विकास झालेला आहे. सरकार युवक आणि महिला यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर भर देत आहे. सातत्याने विकास करण्यामध्ये गोवा राज्य देशात चौथ्या क्रमांकावर आहे. गोवा राज्य आकाराने लहान असल्याने या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर नल’ (प्रत्येक घरात नळ), ‘हर ग्राम सडक’ (प्रत्येक गावात रस्ता), सर्व घरांमध्ये वीजपुरवठा करणे आदी १३ योजनांची ८० टक्के कार्यवाही झालेली आहे. गोव्यात ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेचे रूपांतर ‘स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेत केले आहे. गोव्यात ‘क्लिन इंडिया’, ‘मेक इन इंडिया’(स्वदेशीला प्रोत्साहन), ‘मेड इन इंडिया’ (स्वदेशी) आदी योजनांची चांगल्या रितीने कार्यवाही केली जात आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे नवीन भारत सिद्ध करण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील १० वर्षांच्या कार्यकाळात पूर्णत्वास येत आहेत. केंद्राच्या ‘विकसित भारत २०४७’प्रमाणे ‘विकसित गोवा २०४७’ सिद्ध करण्याच्या प्रयत्नांना प्रारंभ झालेला आहे.