आचरा येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटक येथील नौकेवर कारवाई !

मत्स्य व्यवसाय विभागाच्या देवगड कार्यालयाची महिन्यातील तिसरी कारवाई

देवगड समुद्रात पकडलेली कर्नाटक येथील मासेमारी नौका आणि त्यावरील मासेमारांसह मत्स्य विभागाचे गस्तीपथक (खाली बसलेले नौकेतील मासेमार – माहितीसाठी)

देवगड – मालवण तालुक्यातील आचरा समुद्रात १७ वाव सागरी अंतरात अवैधरित्या मासेमारी करणारी मलपी, कर्नाटक येथील एक यांत्रिक मासेमारी नौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या देवगड कार्यालयाच्या गस्तीनौकेने पाठलाग करून पकडली; मात्र अन्य परप्रांतीय मासेमार त्यांच्या नौका घेऊन पसार झाले.

मंगळवार, २४ डिसेंबर या दिवशी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.  पकडलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली. या नौकेत असलेल्या मासळीचा लिलाव करण्यात येऊन दंडात्मक कारवाईच्या दृष्टीने कार्यवाही चालू करण्यात आली आहे. या नौकेवर ७ खलाशी होते. मत्स्य व्यवसाय विभागाच्या देवगड येथील कार्यालयाने अवैधरित्या मासेमारीच्या विरोधात केलेली या महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे.

ही कारवाई मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी पार्थ तावडे, पोलीस हवालदार नीलेश पाटील, सागर सुरक्षारक्षक योगेश फाटक, धाकोजी खवळे, संतोष टूकरूल आणि अल्पेश नेसवणकर यांच्या पथकाने केली.