गोव्यात ३ खनिज क्षेत्रांत खनिज उत्खननास ‘एस्.ई.आय्.ए.ए.’ची मान्यता
पणजी, २५ डिसेंबर (वार्ता.) – ‘राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणा’ने (‘एस्.ई.आय्.ए.ए.’ने -‘द स्टेट एन्व्हार्यर्न्मेंट इम्पेट असेसमेंट अथॉरिटी’ने) कुडणे-करमळी खाण ब्लॉक-६, कुडणे खाण ब्लॉक-७ आणि थिवी, पिर्ण खाण ब्लॉक-८ यांना खाण व्यवसाय चालू करण्यास अनुमती दिली आहे. एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या ‘ई-निविदे’च्या दुसर्या टप्पात या तिन्ही खनिज ‘ब्लॉक’चा (क्षेत्रांचा) ई-लिलाव झाला होता. कुडणे-करमळी खाण ब्लॉक-६, कुडणे खाण ब्लॉक-७ आणि थिवी, पिर्ण खाण ब्लॉक-८ या तिन्ही ‘ब्लॉक’ंची ‘ई-निविदा’ अनुक्रमे ‘जे.एस्.डब्लू स्टील लि.’, ‘वेदांता’ आणि ‘के.ए.आय्. इंटरनॅशनल प्रा.लि.’ यांनी जिंकल्या आहेत. या तिन्ही खनिज ब्लॉकची (क्षेत्रांची) प्रतिवर्षी १३ लाख ३० सहस्र टन खनिज मालाचे उत्खनन करण्याची क्षमता आहे.
‘एस्.ई.आय्.ए.ए.’ने यापूर्वी चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये अन्य ३ खनिज ‘ब्लॉक’ना खनिज उत्खनन करण्यास मान्यता दिली होती. आतापर्यंत ‘ई-निविदा’ झालेल्या १२ खाण ‘ब्लॉक’मधील दोघांनी खाण व्यवसायाला प्रारंभ केला आहे, तर ५ आस्थापनांनी पर्यावरण दाखल मिळाल्यानंतर अन्य दाखले मिळवण्याची प्रक्रिया चालू केली आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये ‘ई-निविदा’ करण्यात आलेले सर्व खाण ‘ब्लॉक’ सर्व दाखले मिळवून ते खाण व्यवसाय चालू करणार, अशी गोवा सरकारला आशा आहे. गोवा सरकारने वर्ष २०२४-२५ मध्ये खाण व्यवसायामधून ५१३ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. गोवा सरकारला वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात खाण व्यवसायातून ८० कोटी रुपये महसूल मिळाला होता.