AIMIM Nominated Accused Of Delhi Riots : देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण याला विधानसभेत उमेदवारी देण्याचा ए.आय.एम्.आय.एम्.चा प्रयत्न !

(ए.आय.एम्.आय.एम्. म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ)

देहली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाण (चौकटीतील)

नवी देहली – खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ए.आय.एम्.आय.एम्.  या पक्षाचे देहली प्रमुख शोएब जमाई यांनी देहली झालेल्या दंगलीतील आरोपी शाहरूख पठाण याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. एम्.आय.एम्. पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत शाहरूख पठाण याला उमेदवारी देऊ शकतो, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात होऊ लागली आहे. पठाण सध्या कारागृहात आहे.

या संदर्भात शोएब जमाई यांनी ‘एक्स’ पोस्ट करत म्हटले की, अलीकडेच मी कारागृहात असलेल्या शाहरूख पठाण याच्या आईला त्यांच्या घरी भेटलो. आमच्या पक्षाच्या शिष्टमंडळाने त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांची स्थिती अन् कायदेशीर साहाय्याविषयी चर्चा केली. ज्यांची मुले अनेक वर्षांपासून कारागृहात आहेत, अशांना न्याय मिळवून देण्याच्या मोहिमेतील आमचे हे छोटेसे पाऊल त्यांना प्रोत्साहन देईल. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ज्या बंदीवानांचे खटले प्रलंबित आहेत, त्यांना जामीन मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. ‘अरविंद केजरीवाल यांच्या सूचनेवरूनच माझ्या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि मी हे विसरू शकणार नाही’, असे पठाण याच्या आईचे म्हणणे आहे.

पोलीस हवालदाराला पिस्तूल दाखवून धमकावले होते !

२० फेब्रुवारी २०२० या दिवशी देहलीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये देहलीच्या ईशान्य भागात दंगल उसळली होती. यात किमान ५३ लोक मारले गेले होते. याच दंगलीच्या वेळी २४ फेब्रुवारीला देहलीच्या मौजपूर-जाफ्राबाद भागात शाहरूख पठाण याने पोलीस हवालदार दीपक दहिया यांच्यावर उघडपणे पिस्तूल दाखवले होते. या घटनेचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले होते.

संपादकीय भूमिका

एका पोलीस हवालदाराला पिस्तूल दाखवून धमकावणार्‍याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार्‍या पक्षाची मानसिकता यातून स्पष्ट होते ! अशा पक्षांवर बंदी घालण्याची मागणी हिंदु संघटनांनी करणे आवश्यक आहे !