ठाणे येथील शास्त्रीय गायक (कै.) पं. संजय मराठे यांची स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवरील जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

गायक, संवादिनी आणि ऑर्गन (एक वाद्य) वादक पंडित संजय मराठे (वय ६८ वर्षे) यांचे १५.१२.२०२४ या दिवशी ठाणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे रुग्णालयात निधन झाले. २६.१२.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे.

‘१.४.२०२२ या दिवशी पं. संजय मराठे (संगीत भूषण पं. राम मराठे यांचे ज्येष्ठ पुत्र) यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रामध्ये आगमन झाले. त्यानंतर त्यांनी सलग दोन दिवस ३ अनवट (अप्रचलित) रागांचे गायन केले.

पं. मराठे यांना प्रथमदर्शनी पाहून, त्यानंतर त्यांच्या संगीताच्या प्रयोगांच्या वेळी आणि त्यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना त्यांची स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवरील लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

गायन करतांना पं. संजय मराठे

१. पं. संजय मराठे यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात पांढर्‍या रंगाचे प्रकाशकिरण प्रक्षेपित होतांना जाणवणे

पं. संजय मराठे यांना मी पाहिले, तेव्हा त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात पांढर्‍या रंगाचे प्रकाशकिरण प्रक्षेपित होतांना जाणवले. याचे कारण भगवंताला विचारल्यावर भगवंताने सांगितले की, ‘पं. संजय मराठे यांचे अंतर्मन पुष्कळ निर्मळ आहे. त्यामुळे संशोधनकेंद्रामध्ये कार्यरत असणार्‍या निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्याचे बिंब त्यांच्या अंतर्मनावर पडून त्याचे प्रतिबिंब पं. मराठे यांच्या अंतर्मनातून या चैतन्यदायी प्रकाशकिरणांचे प्रक्षेपण झाले. त्यामुळे त्यांच्या देहातून चैतन्य पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाले.

२. पं. संजय मराठे यांचे अंतर्मन बाळाप्रमाणे निर्मळ आणि निरागस असणे

पं. संजय मराठे यांचे अंतर्मन बाळाप्रमाणे निर्मळ आणि निरागस आहे. त्यामुळे त्यांच्या अंतर्मनात वहाणार्‍या आनंदाच्या झर्‍याचे प्रतिबिंब त्यांच्या मुखावर पडते. त्यामुळे त्यांचे मुख सतत निरागस बाळाप्रमाणे आनंदी दिसते आणि ते सतत हसतमुख असतात.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

३. पं. संजय मराठे यांचा अहं अल्प असल्यामुळे त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

३ अ. स्वत:च्या चुकाही प्रांजळपणे सांगणे : पं. संजय मराठे यांचा अहं अल्प आहे. त्यामुळे ते आमच्याशी बोलत असतांना जेव्हा त्यांच्या वडिलांच्या संदर्भात सांगत होते, तेव्हा ते त्यांच्याकडून बालपणी झालेल्या स्वत:च्या चुकाही प्रांजळपणे सांगत होते.

३ आ. सतत वर्तमानकाळात राहून संगीताच्या साधनेमध्ये तल्लीन असणे : पं. संजय मराठे यांचा अहं अल्प असल्यामुळे ते स्वत:शी निगडित असणार्‍या भूतकाळातील विचारांमध्ये कधीच अडकत नाहीत आणि सतत वर्तमानकाळात राहून संगीताच्या साधनेमध्ये तल्लीन असतात.

३ इ. सर्वांशी मनमोकळेपणे बोलणे आणि सहजावस्थेत वावरणे : पं. मराठे यांच्यामध्ये अहं अल्प असल्यामुळे ते सर्वांशी मनमोकळेपणे बोलतात आणि सहजावस्थेत वावरतात. त्यामुळे ‘ते आपल्या कुटुंबातील सदस्यच आहेत’, असे मला जाणवले.

४. पं. संजय मराठे यांचा कल मायेकडे नसून भगवंताकडे असल्यामुळे संगीताच्या माध्यमातून त्यांचे सतत ईश्वराशी अनुसंधान असल्यामुळे त्यांची वृत्ती सतत अंतर्मुख असणे

पं. संजय मराठे यांचा कल मायेकडे नसून भगवंताकडे आहे. ते संगीताच्या माध्यमातून ईश्वराशी अखंड अनुसंधान चालू असते. त्यामुळे त्यांची वृत्ती सतत अंतर्मुख राहून संगीताच्या माध्यमातून भगवंताला अनुभवत असते.

५. पं. मराठे यांच्यामध्ये विविध देवतांचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची अद्भुत क्षमता असणे

पं. मराठे जेव्हा सगुण स्तरावर गातात, तेव्हा त्यांच्या गायनातून श्रीराम, दत्त, गणेश इत्यादी देवतांचे सगुण-निर्गुण स्तरावरील तत्त्व वातावरणात पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होते. जेव्हा ते निर्गुण स्तरावर गातात, तेव्हा त्यांच्या गायनातून शिवाचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होते. त्यांच्यामध्ये विविध देवतांचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची अद्भुत क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी केलेल शास्त्रीय गायन वाईट शक्तींचा त्रास न्यून करण्यासाठी म्हणजे आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी पुष्कळ प्रमाणात पूरक आहे.

६. पं. संजय मराठे गात होते, तेव्हा मला त्यांच्या कंठाच्या ठिकाणी पांढर्‍या रंगाचा तारा चमकतांना दिसणे आणि यांच्या कंठामध्ये साक्षात् सरस्वतीदेवीचा वास असल्याचे समजणे

जेव्हा पं. संजय मराठे गात होते, तेव्हा मला त्यांच्या कंठाच्या ठिकाणी पांढर्‍या रंगाचा तारा चमकतांना दिसला. याविषयी देवाला विचारल्यावर देवाने सांगितले की, त्यांच्यावर श्री सरस्वतीदेवीची कृपा असल्यामुळे त्यांना शास्त्रीय संगीताचे ज्ञान अवगत झाले आहे. त्यांचे वडील पंडित राम मराठे यांच्याप्रमाणे त्यांचे सुपुत्र पं. संजय मराठे यांच्या कंठामध्ये साक्षात् सरस्वतीदेवीचा वास आहे. त्यामुळे त्यांच्या आवाजात गोडवा जाणवतो आणि ते तार सप्तकापर्यंत चांगले गाऊ शकतात.

७. पं. संजय मराठे हे लहानपणापासून आतापर्यंत अखंड शिष्यभावात असल्यामुळे त्यांना संगीतातील गूढ ज्ञान प्राप्त झालेले असणे

जेव्हा ते त्यांच्या पित्याविषयी(पं. राम मराठे) बोलत होते, तेव्हा ते शिष्यभावात असल्याचे जाणवले. त्यांनी त्यांच्या पित्याकडे कधीच पिता म्हणून न पहाता ‘संगीतकलेत पारंगत असणारे गुरु’ म्हणून पाहिले. पं. संजय मराठे हे लहानपणापासून आतापर्यंत अखंड शिष्यभावात असल्यामुळे त्यांना संगीतातील गूढ ज्ञान प्राप्त झालेले आहे. श्री. संजय मराठे यांच्यातील शिष्यभावामुळे त्यांचे गुरु पंडित राम मराठे यांचे तेजस्वी पिवळसर रंगाच्या गोळ्याच्या रूपाने त्यांचे अस्तित्व गायन आणि मार्गदर्शन यांच्या वेळी जाणवते.

८. पं. संजय मराठे यांचे गायन भावावस्थेत झाल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या साधकांचाही भाव जागृत होणे

पं. संजय मराठे यांच्यामध्ये त्यांच्या गुरुंप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. त्यामुळे जेव्हा ते त्यांच्या गुरूंविषयी मार्गदर्शनाच्या वेळी सांगत होते किंवा गायनाच्या वेळी श्री गुरूंचे स्मरण करत होते, तेव्हा त्यांचा भाव जागृत होत होता. त्यांची भावावस्था पाहून माझाही भाव जागृत होत होता.

९. संगीतातून शिवाची आराधना चालू असल्याचे जाणवणे

पं. मराठे जेव्हा गात होते, तेव्हा त्यांच्या हृदयात शिवपिंडीचे दर्शन झाले. त्यांच्या गाण्यातील बोल आणि स्वर यांचे रूपांतर बेलाचे पान, पांढरी फुले आणि पंचामृत यांमध्ये होऊन त्यांच्या हृदयातील शिवपिंडीवर बिल्वार्चन, पुष्पार्चन आणि पंचामृत यांचा अभिषेक झाल्याचे दृश्य दिसले. यावरून त्यांची संगीतातून शिवाराधना चालू असल्याचे जाणवले. (त्यांचे कुलदैवत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील ‘श्री व्याडेश्वर’ हे शिवाचे रूप आहे. – संकलक)

१०. पं. संजय मराठे यांच्यावरील श्री सरस्वतीदेवीची कृपा असल्यामुळे त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये

१० अ. गायनातून निर्गुण -सगुण स्तरावरील चैतन्यलहरी वातावरणात प्रक्षेपित होऊन वातावरणाची अल्पावधीत शुद्धी होणे आणि वातावरण हलके अन् प्रसन्न होणे : त्यांच्या मनाच्या निमळतेमुळे त्यांच्या गायनातून अधिक प्रमाणात निर्गुण -सगुण स्तरावरील चैतन्यलहरी वातावरणात प्रक्षेपित होऊन वातावरणाची अल्पावधीत शुद्धी होते. त्यामुळे त्यांचे गायन चालू झाल्यावर वातावरणात सूक्ष्मातून जाणवणारा दाब न्यून होऊन वातावरण हलके आणि प्रसन्न होते.

१० आ. कंठामध्ये श्री सरस्वतीदेवीचा वास असल्यामुळे त्यांच्या आवाजात गोडवा आणि सात्त्विकता जाणवणे : त्यांच्या कंठामध्ये श्री सरस्वतीदेवीचा वास असल्यामुळे त्यांच्या आवाजात गोडवा आणि सात्त्विकता जाणवते. श्री सरस्वतीदेवीच्या कृपेमुळेच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील शुद्ध स्वर चांगल्या प्रकारे गाता येतात.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२२)

((कै.) पं. संजय मराठे यांच्याविषयीचे हे लिखाण त्यांच्या निधनापूर्वीचे असल्याने त्यांना ‘कै.’ असे लावलेले नाही. – संकलक)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.