गुरु गोविंदसिंह यांच्या पुत्रांचे बलीदान युवापिढीसाठी आदर्शवत् !
आज ‘वीर बाल दिवस’ आहे. त्यानिमित्त…
२० ते २७ डिसेंबर या कालावधीत शीख नानकशाही दिनदर्शिकेनुसार शिखांचे १० वे धर्मगुरु गोविंदसिंह यांच्या कुटुंबियांच्या बलीदान दिवसानिमित्त ‘शहीद सप्ताह’ पाळला जातो. आजही मुलांना गुरु गोविंदसिंह यांच्या कुटुंबियांच्या बलीदान कथांच्या माध्यमातून बोधामृत दिले जाते. भजन, कीर्तन, तसेच अन्य अनेक कृतींमधून शीख समुदायातील साधक गुरु गोविंदसिंह यांच्या माता गुजरी आणि हुतात्मा झालेले २ पुत्र यांना श्रद्धांजली अर्पण करतात.
जेव्हा वर्ष १७०५ मध्ये मोगलांनी गुरु गोविंदसिंह यांचा सूड घेण्यासाठी सरसा नदीवर आक्रमण केले, तेव्हा गुरु गोविंदसिंह यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची ताटातूट झाली. गुरु गोविंदसिंह यांच्या मातोश्री गुजरी या छोटे पुत्र बाबा जोरावर सिंह (वय ९ वर्षे ) आणि बाबा फतेह सिंह (वय ७ वर्षे) यांना घेऊन त्यांचा स्वयंपाकी गंगू यांच्या घरी गेल्या. रात्री माता गुजरी यांच्या जवळील सुवर्ण मोहरा पहाताच स्वयंपाकी गंगू याची मती फिरली. त्याने बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्यासह माता गुजरी यांना मोगल नवाब वजीर खानाला सुपुर्द केले. नवाब वजीर खान याने तिघांनाही त्रास देण्याच्या उद्देशाने पौष महिन्यातील प्रचंड थंडीच्या रात्री ‘ठंडा बुर्ज’ नामक खुल्या आणि उंच जागेत नेऊन ठेवले. येथेच माता गुजरी यांनी त्यांच्या दोन्ही नातवांना राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी मोगलांपुढे मान न झुकवता लढण्याचे अन् धर्मनिष्ठेसाठी प्राणार्पण करण्याचे धडे दिले. प्रत्येक वेळेस नवाब वजीर खान याच्या कचेरीत जातांना माता गुजरी मुलांना हाच पाठ पढवून पाठवत असत. इतक्या लहान वयातही या दोन्ही शूरविरांनी वजीर खानाच्या अन्यायाला सडेतोड उत्तर दिले. स्वत:वर होत असलेल्या अत्याचारांना घाबरून मोगलांपुढे मान झुकवली नाही वा धर्म पालटला नाही. यामुळे रागावलेल्या वजीर खानाने दोन्ही मुलांना किल्ल्याच्या भिंतीत जिवंत पुरून मारून टाकले. तो दिवस होता २६ डिसेंबर १७०५ ! ही वार्ता माता गुजरी यांच्या कानी पडताच त्यांनीही देहत्याग केला. या दोन्ही छोट्या शूरविरांचे धर्माप्रती समर्पण मोगलांसाठी पुढे पुष्कळ त्रासदायक ठरले. या दोन्ही विरांनी धर्माच्या तत्त्वांपासून विचलीत होण्यापेक्षा मृत्यू कवटाळला.