Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृतीशील होण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार !
मंदिर न्यास परिषद दुसरा दिवस
कोणत्याही परिस्थितीत मंदिरांची मालकी सरकारकडे देऊ नका ! – डॉ. अमित थढाणी, सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक
मंदिरांच्या सरकारीकरणामागे विश्वस्तांमधील दुही हे सर्वांत मोठे कारण आहे. मंदिरांतील अडचणी घेऊन विश्वस्तांनी सरकारकडे जाणे म्हणजे मंदिराचा अधिकार सरकारकडे देण्यासारखे आहे. मंदिराचे व्यवस्थापन अयोग्य वाटल्यास सरकार मंदिराचे व्यवस्थापन हातात घेऊ शकते; मात्र हे ६ महिन्यांपर्यंत ठीक आहे. त्यानंतर मंदिरांचे व्यवस्थापन पुन्हा योग्य भक्तांच्या हातात द्यायला हवे; मात्र कायमस्वरूपीच मंदिरांचे सरकारीकरण अयोग्य आहे. सरकारने कोणत्याही मंदिराची मालकी घेण्याचा प्रयत्न केलाच, तर हिंदूंनी त्याविषयी सतर्क असायला हवे. सरकारी अधिकारी मंदिराची मालकी घ्यायला आल्यास तेथे मोठ्या प्रमाणात हिंदूंनी एकत्र यायला हवे. स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या बाजूने असल्यास त्यांनाही तेथे बोलवावे. अशा वेळी हिंदूंनी त्वरित मंदिराला कुलूप लावायला हवे. कोणत्याही परिस्थितीत मंदिराची कागदपत्रे आणि मंदिराची मालकी सरकारकडे देऊ नये. अशा वेळी विश्वस्तांनी त्वरित न्यायालयात याचिका करायला हवी. यासाठी हिंदूंनी मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांचा उपयोग करायला हवे. गुवाहाटी राज्यातील कामाख्यादेवीच्या मंदिराचे काँग्रेसने सरकारीकरण केले, तेव्हा भाजपने त्यांना विरोध केला; मात्र त्याच भाजपने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये पुजारी लूट करतात म्हणून या मंदिराच्या सरकारीकरणाचे समर्थन केले.
कानिफनाथ ‘वक्फ’च्या तावडीतून सोडवण्यासाठी हिंदूंचे पाठबळ हवे ! – हरि आंबेकर, विश्वस्त, श्री कानिफनाथ महाराज मंदिर
गुहा (अहिल्यानगर) येथील कानिफनाथ देवस्थानावर वक्फ बोर्डाच्या माध्यमातून धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे. त्या विरोधात गावपातळीवर आम्ही जनआंदोलन उभारले आहे. हे प्रकरण वक्फ बोर्डाच्या न्यायालयात असल्यामुळे निवाडा होत नाही, तसेच वक्फ कायद्यानुसार त्यांनी निर्णय दिल्याखेरीज पुढील न्यायालयातही जाता येत नाही. या कात्रीत सापडल्यामुळे दर्ग्याच्या बाजूने असणार्या लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी न्यायालयीन लढा लढण्यासाठी आम्हाला चांगले अधिवक्ते आणि हिंदूंचे पाठबळ यांची आवश्यकता आहे. मुसलमानांना देवस्थानचे ‘कानिफनाथ’ हे नाव पालटून ‘रमजान शहा बाबा’ नाव लावायचे होते. या विरोधात आम्ही घरोघरी जाऊन जनजागृती केली आणि ‘मंदिर वाचवण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागेल’, असे सांगितले. त्यासाठी आम्ही ग्रामसभा आयोजित केली आणि त्यात ‘गावामध्ये रमजान शहा हा दर्गा कुठेही नाही, तसेच कानिफनाथ देवस्थानाला रमजान शहा बाबाचे नाव लावता येणार नाही’, असा ठराव संमत करून घेतला. त्यानंतर मंदिरात चालू असलेली साप्ताहिक आरती प्रतिदिन चालू केली. त्यामुळे त्यांनी २० गावकर्यांच्या विरोधात वक्फ ट्रिब्रुनलमध्ये (प्राधिकरणामध्ये) दावा प्रविष्ट केला. आम्ही कागदपत्रे सादर केली; पण न्यायाधीश त्यांचेच असल्यामुळे ते २ वर्षांपासून दिनांकावर दिनांक देत आहेत. त्यांनी मंदिरात किंवा दर्ग्यात न जाण्याविषयी २० हिंदू आणि त्यांच्या ११ जणांना मनाई आदेश कायम ठेवला होता. संपूर्ण गावाने प्रशासनाने लावलेल्या कलम १४४ च्या विरोधात राहुरी येथे मोठा मोर्चा काढला आणि ते कलम रहित करण्यास भाग पाडले.
हिंदूंमधील संघटन हेच धर्मावरील आघातांवरील उत्तर होय ! – ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री, महंत-मठाधिपती, तारकेश्वर गड, बीड
दुसर्याचे बळकावून घेतो, त्यांना ‘राक्षस’ म्हणतात. मंदिरांचे सरकारीकरण हेही राक्षसी कृत्य आहे. मंदिरांमध्ये माणुसकी शिकवली जाते. अन्य पंथीय मात्र स्वैराचारी वागतात, दुष्कृत्य करतात. हिंदु धर्म हा विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारा एकमेव धर्म आहे. मंदिरांमध्ये सर्वांविषयी आदराची भावना बाळगण्याची शिकवण दिली जाते. मंदिरांवर कोट्यवधी जनतेचा उदरनिर्वाह चालतो. जेथे शब्द शिल्लक रहात नाहीत, तेथे माणूस झुकतो, हे स्थान मंदिरांचे आहे. हिंदु धर्म हा संवेदनशील आहे. पाणी सांडले, तरी हिंदूंना वाईट वाटते; मात्र रक्ताचे पाट वाहिले, तरी अन्य धर्मियांना काहीच वाटत नाही. हे अयोग्य आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या कालावधीत हिंदू संघटित होत असल्याचे दिसून आले. बांगलादेशात हिंदूंवर झालेले अत्याचार हिंदूंनी समजून घ्यायला हवेत. हिंदूंचे संघटन हेच धर्मावरील सर्वच आघातांवरील एकमेव उत्तर आहे, हे हिंदूंनी वेळीच जाणावे !
मंदिरांतील उपक्रम ‘साधना’ म्हणून करूया ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मंदिर-न्यास परिषदेत जे शिकायला मिळाले, ते कृतीत आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. त्याला साधनेची जोड द्यावी. मंदिरात राबवण्यात येणारे उपक्रम साधना म्हणून कसे होतील ? हे पाहूया. आरती भावपूर्ण करणे, आरतीद्वारे ईश्वराला आर्ततेने आळवणे, मंदिराच्या माध्यमातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे, असे प्रयत्न करायला हवेत. मंदिराची स्वच्छता करतांना, देवतेची पूजा करतांना प्रार्थना-कृतज्ञता व्यक्त करायला हवी. हे सर्व ‘साधना’ म्हणून करायला हवे. मंदिरामध्ये ‘नामस्मरण’ करण्याचा उपक्रमही राबवायला हवा. अशा प्रकारे सर्व उपक्रम ‘साधना’ म्हणून केल्यास ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो.
संस्कृतीच्या रक्षणासाठी मंदिरांतील अपप्रकार थांबवणे आवश्यक ! – संजय जोशी, महाराष्ट्र समन्वयक, मंदिर महासंघ
शिर्डी – काही मंदिरांमध्ये नाताळच्या निमित्ताने देवाच्या मूर्तीला ‘सांताक्लॉज’चा वेश घालणे, पाश्चात्त्यांप्रमाणे केक कापून देवाचा उत्सव साजरा करणे, सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली इफ्तारचे आयोजन करणे, काही मंदिरांमध्ये पूजा-अर्चा किंवा आराधना यांचे व्यवसायीकरण करणे, पूजा-अभिषेक यांसाठी किंवा ‘व्हीआयपी दर्शना’साठी (अतीमहनीय व्यक्तींसाठी) अवास्तव मूल्य आकारले जाणे, मंदिराला दान दिलेल्या वस्तूंचा अयोग्य वापर करणे, पुजार्यांकडून अयोग्य कृती होणे, मानापमानामुळे मंदिराकडे दुर्लक्ष होणे, मंदिरात अस्वच्छता असणे, अयोग्य व्यक्तींच्या नेमणुका करणे, असे अपप्रकार कळत-नकळतपणे, तसेच संकुचितपणाच्या भावनेपोटी, अयोग्य दृष्टीकोन किंवा धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळे घडतात. त्यामुळे मंदिरांतील पावित्र्य अल्प होतेच; पण अपप्रकार होऊ देणार्यांनाही पातक लागते. अपप्रकार थांबवण्यासाठी विश्वस्तांनी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
‘मंदिर विश्वस्त’ हे अधिकाराचे नव्हे, तर दायित्वाचे पद ! – दिलीप देशमुख, माजी सह धर्मादाय आयुक्त
मंदिराचे विश्वस्त हे अधिकाराचे पद नाही, तर ते दायित्वाचे पद आहे, हे प्रत्येक मंदिर विश्वस्ताने नेहेमी लक्षात ठेवायला हवे. प्रत्येक मंदिराच्या विश्वस्तांनी शासनाकडे हिशेब प्रमाणपत्र सादर करावे, तसेच हिशेबनीसाची नियुक्ती करून प्रत्येक वर्षी हिशेब पूर्ण करावा. मंदिराच्या चल-अचल संपत्तीची नोंद मंदिराच्या विश्वस्तांकडे असणे आवश्यक असते. भाविकांनी मंदिरात अर्पण केलेले सोने-चांदी, अन्य वस्तू यांच्या चोख नोंदी असणे आवश्यक आहे. मंदिरात चोरी झाल्यास या नोंदींचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो. ३ महिन्यांनी याचा हिशेब करावा.
‘वक्फ’च्या भयानकतेत वाढ ! – अधिवक्त्या सिद्धविद्या, उच्च न्यायालय
वक्फ म्हणजे कोणतीही चल अथवा अचल संपत्ती अल्लाच्या नावावर अनंत काळासाठी देणे. या कायद्याच्या अंतर्गत संपत्तीचे हस्तांतरण घातक पद्धतीचे आहे. पूर्वी वक्फ संदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. येथे होणारी भांडणे-तंटे वैयक्तिक स्तरावर हाताळले जात असत; मात्र नंतर याचे स्वरूप वाढत गेले. वर्ष २०२४ पर्यंत वक्फ बोर्डाकडे ९ लाख ५० सहस्र एकर भूमी असून भारतातील तिसर्या क्रमांकाचा भूमीमालक वक्फ बोर्ड आहे. याची भयानकता वाढत आहे.
हिंदूंच्या तीर्थस्थळी अहिंदूंची दुकाने न होण्याविषयी जागृती करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्णय !
‘मंदिरात अहिंदूंना प्रवेश आणि व्यवसाय बंदी’ या विषयावर २५ डिसेंबर या दिवशी परिसंवाद
शिर्डी – हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गोमातेची हत्या करणारे, गोमांस खाणारे, तसेच हिंदूंना हलाल उत्पादनांची विक्री करून तो पैसा हिंदूंच्या विरोधात वापरणार्यांची दुकाने हिंदूंच्या तीर्थस्थळी निषिद्ध आहेत. त्यामुळे हिंदूंच्या तीर्थस्थळी अहिंदूंची दुकाने होऊ नयेत, याविषयी सर्व विश्वस्त आणि समस्त हिंदू यांमध्ये जागृती करण्याचा निर्णय शिर्डी येथील मंदिर-न्यास परिषदेत उपस्थित विश्वस्तांनी घेतला. ‘मंदिरात अहिंदूंना प्रवेश आणि व्यवसाय बंदी’ या परिसंवादाच्या वेळी विश्वस्तांनी हात उंचावून याविषयीची सिद्धता दर्शवली.
या परिसंवादामध्ये पू. सुदर्शन महाराज कपाटे, महंत अनिकेतशास्त्री जोशी, श्री काळाराम देवस्थानचे पुजारी महंत सुधीरदास महाराज, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, श्री तुळजापूर देवस्थानाच्या पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे सहभागी झाले होते. श्री. सतीश कोचरेकर यांनी या परिसंवादाचे संचालन केले. या वेळी महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज म्हणाले, ‘‘हिंदूंचा घात करणार्यांवर हिंदूंनी आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे. ‘ओम प्रमाणपत्रा’द्वारे हिंदूंनी त्यांना झटका द्यायला हवा. ज्यांनी ओम प्रमाणपत्र घेतले आहे, तेथूनच हिंदूंनी खरेदी करावी. प्रत्येक हिंदूला स्वत:च्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे.’’ पू. सुदर्शन महाराज कपाटे या वेळी म्हणाले, ‘‘देवस्थानच्या परिसरामध्ये अहिंदूंची दुकाने असू नयेत, यासाठी मंदिरांच्या विश्वस्तांनी ठराव करावा. यासह हिंदूंनी हिंदूंसमवेत आर्थिक व्यवहार करण्याचा निश्चय करावा.’’ महंत सुधीरदास महाराज म्हणाले, ‘‘मंदिर परिसरात अहिंदूंचा व्यवसाय असू नये, याविषयी विश्वस्तांनी कठोर भूमिका घ्यायला हवी. आपण कुणाकडून वस्तू खरेदी करावी ? याचा अधिकार राज्यघटनेने आपल्याला दिला आहे.’’ श्री. किशोर गंगणे म्हणाले, ‘‘मंदिराच्या आवारात मद्यालयांच्या बंदीचा निर्णय सरकारने घ्यायला हवा. हिंदूंच्या तीर्थस्थळी अहिंदूंचा व्यवसाय असू नये, यासाठी मंदिर महासंघाच्या माध्यमातून सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा.’’
श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘पुरोगामी मंडळी सोयीनुसार राज्यघटनेचा उपयोग करतात. अन्य वेळी मात्र राज्यघटनेची अवहेलना करतात. प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये अहिंदूंना दुकान थाटण्याला उत्तरप्रदेशच्या राज्यशासनाने बंदी घातली आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनानेही हिंदूंच्या धार्मिक यात्रा आणि उत्सव यांच्या वेळी लागू करावा.’’
धर्माची सुरक्षा करण्याची रणनीती मंदिरातून निश्चित व्हायला हवी ! – गिरीश शहा
‘भक्तांना मंदिरांशी जोडणे, धर्मशिक्षण’ या विषयांवर २४ डिसेंबरला झालेला परिसंवाद !
शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर), २५ डिसेंबर (वार्ता.) – प्रतिदिन लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामध्ये युवावर्गही मोठ्या प्रमाणात असतो. त्या युवावर्गाला सेवा आणि सत्संग यांच्याशी जोडणे आवश्यक आहे. सेवा आणि सत्संग यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गोवा येथील सनातनचा आश्रम ! धर्माचे रक्षण करायचे असेल, तर राष्ट्राचे रक्षण होणे आवश्यक आहे. धर्माची सुरक्षा करण्याची रणनीती मंदिरातून निश्चित व्हायला हवी. मंदिराच्या व्यवस्थापनात येणार्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी अधिवक्त्याचा एक सल्लागार आणि कृतीशील गट असणे अत्यंत उपयुक्त ठरते. हा गट कायद्याशी संबंधित विविध विषयांवर मंदिराला साहाय्य करू शकतो, असे मत मुंबई येथील ‘समस्त महाजन संघा’चे अध्यक्ष श्री. गिरीश शहा यांनी व्यक्त केले.
येथील मंदिर संस्कृती रक्षणार्थ तृतीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत २४ डिसेंबर या दिवशी धर्मशिक्षण, भक्तांना मंदिरांशी जोडण्याच्या कृतीवर चर्चा, मंदिरातून सामूहिक आरती, सामूहिक उपक्रम इत्यादी विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या परिसंवादात ‘श्री जीवदानी देवी संस्थान’चे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर, श्री. गिरीश शहा, अधिवक्ता सुरेश कौदरे, श्री. राजेंद्र जोंधळे, श्री. सुनील घनवट इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते. या परिसंवादाचे संचालन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.
मंदिरे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करत आहोत ! – राजेंद्र जोंधळे, जनसंपर्क अधिकारी, भद्रा मारुति
भद्रा मारुति मंदिर हे रामराज्यातील मंदिर आहे. येथे महाराष्ट्रासह संपूर्ण भारत आणि विदेशातीलही भाविक येतात. शुक्रवार, शनिवार या दिवशी या ठिकाणी एक ते दीड लाख भाविक येतात. संपूर्ण भारताशी आम्ही जोडलेले आहोत. प्रत्येक शनिवारी या ठिकाणी अन्नछत्र चालू असते आणि लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. भाविकांच्या अर्पणावर मंदिराचे व्यवस्थापन चालू आहे. मंदिरे स्वयंपूर्ण व्हावीत, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उठवणे आवश्यक ! – अधिवक्ता सुरेश कौदरे
परिषदेच्या ठिकाणी ७०० हून अधिक मंदिरातील विश्वस्त उपस्थित आहेत. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उठवल्यास खर्या अर्थाने हे सनातन हिंदु राष्ट्र होईल आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यास साहाय्य होईल.
मंदिरे ही शौर्याची स्थाने होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
पुणतांबा येथे महादेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. अशा वेळी किती भाविक या विरोधात रस्त्यावर आले ? कित्येक ठिकाणी मूर्तींची तोडफोड होते, विटंबना करण्यात येते, अशा आपत्कालीन स्थितीमध्ये किती भाविक या विरोधात लढतात ? किती जण यामध्ये सहभागी होतात ? हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी एक व्यवस्था बनवावी लागेल. राष्ट्र-धर्म विषयक उपक्रम राबवल्यास, कुटुंबे मंदिरांशी जोडणे हा उपक्रम राबवल्यास, सामूहिक उपासना, आरती चालू केल्यास भक्त मंदिरांशी जोडले जातील. मंदिराच्या व्यवस्थापनात येणार्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी ‘लिगल सेल’, ‘सोशल मीडिया सेल’ आवश्यक आहे. मंदिरे ही सामूहिक उपासनेची केंद्र आहेत, त्याचप्रमाणे ती शौर्याची स्थाने व्हावीत, यासाठी प्रयत्न करायला हवेत.
श्री. प्रदीप तेंडोलकर यांनीही या परिसंवादात समायोचित सूत्रे सांगून मार्गदर्शन केले.