‘प्रत्येक सेवा गुरूंची सेवा असून त्यातून स्वतःचा उद्धार होणार आहे’, असा भाव ठेवून सेवा केल्यावरच खर्या अर्थाने गुरुसेवा होत असणे
१. साधिकेला कचरा मुख्य कचरापेटीत टाकण्याची सेवा मिळाल्यावर तिच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया
‘एकदा मला आश्रमसेवेच्या अंतर्गत माळ्यावरील कचरा मुख्य कचरापेटीत टाकण्याची सेवा मिळाली होती. त्या वेळी मला कचर्याचा दुर्गंध आला आणि माझ्या मनात ‘कचर्याला स्पर्श करू नये आणि कचर्याजवळ जाऊ नये’, असा प्रथम विचार आला. त्या वेळी ‘माझा सेवेप्रती भाव नसल्याने असा अयोग्य विचार माझ्या मनात येत आहे’, याची मला जाणीव झाली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना करणे
तेव्हा मी त्वरित गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) आर्ततेने प्रार्थना केली, ‘हे नारायणस्वरूप गुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित अशी भावपूर्ण सेवा करण्यात मी पुष्कळ अल्प पडते. प्रत्येक सेवा तुमचीच असून तिच्या माध्यमातून तुम्ही मला भेटणार आहात’, असा भाव मला ठेवता येऊ दे.’
३. गुरुस्मरण करत सेवा केल्यावर आलेल्या अनुभूती
त्यानंतर मी गुरुदेवांचे स्मरण करत कचरा गोळा करू लागले. तेव्हा मला पुष्कळ दुर्गंध येऊ लागला. नंतर माझे आपोआप गुरुस्मरण वाढले आणि मला त्या कचर्यातून अकस्मात् रजनीगंधाच्या फुलांचा पुष्कळ सुगंध येऊ लागला. तेव्हा ‘मी कचरा उचलत आहे कि फुलांच्या वाटिकेत (बागेत) आहे ?’, असे मला वाटले.
४. ‘प्रत्येक सेवा गुरूंची सेवा आहे’, असा भाव ठेवल्यावर होत असलेला लाभ
त्या वेळी गुरुदेवांनीच मला जाणीव करून दिली, ‘प्रत्येक सेवा गुरूंची सेवा आहे आणि ती सेवा केल्याने माझा उद्धार होणार आहे’, असा भाव ठेवून सेवा केल्यावरच आपली खर्या अर्थाने गुरुसेवा होते अन् आपला मनोलयही होतो.
५. त्या प्रसंगानंतर दुसर्या दिवसापासून मला कचरा टाकण्याची सेवा करतांना कधीच किळसवाणे वाटले नाही. माझ्याकडून ती सेवा आनंदाने आणि गुरुस्मरणासह झाली.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (९.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |