‘मनमोकळेपणाने बोलणे’, याविषयी साधिकेला सुचलेले काही आध्यात्मिक दृष्टीकोन !
१. साधकांनी उत्तरदायी साधक किंवा संत यांच्याशी मनमोकळेपणे बोलल्याने त्यांना साधनेची दिशा मिळणे आणि मोकळेपणाने न बोलल्यास अन्य साधकांविषयी पूर्वग्रह वाढून साधक अहंच्या विळख्यात अडकणे
‘साधकांनी त्यांच्या मनातील विचार उत्तरदायी साधक किंवा संत यांना मनमोकळेपणाने सांगावेत. साधकांना त्यांच्याकडून साधनेची दिशा मिळते आणि त्यानुसार प्रयत्न केले, तर त्यातून त्यांची साधना होते. असे असूनही काही साधक ‘प्रतिमा जपणे, संकोच वाटणे’ किंवा अन्य काही कारणांस्तव स्वतःच्या अडचणी मनमोकळेपणाने सांगत नाहीत. परिणामी त्यांच्या मनाचा सतत संघर्ष होत रहातो. काही साधकांच्या मनात अनेक वर्षांपासून घडलेले अनेक प्रसंग साठून राहिलेले असतात. त्या त्या वेळी त्या प्रसंगांविषयी न सांगितल्याने साधकांना योग्य दिशा मिळत नाही आणि त्यांचा अन्य साधकांप्रती पूर्वग्रह वाढत जातो. त्यामुळे संबंधित साधक ‘नकारात्मक विचार करणे, निष्कर्ष काढणे, मनाने करणे, चिडचिड करणे’, आदींसारख्या स्वभावदोष आणि अहं यांच्या विळख्यात अडकून पडतात. मनात सतत होणार्या संघर्षाने त्यांचे मन कमकुवत होऊन जाते.
२. साधकांनो, मनमोकळेपणाने बोलणे, म्हणजे बहिर्मुखतेने बोलणे नव्हे, हे समजून घ्या !
काही प्रसंग घडले की, ‘मनमोकळेपणाने बोलायचे’, हा विचार करून साधक प्रयत्नपूर्वक बोलू लागतात; पण एखाद्या प्रसंगात ते एकदम अस्थिर होऊन बोलू लागतात. त्या वेळी ते समोरच्याची स्थिती समजून न घेता अपेक्षा आणि पूर्वग्रह ठेवून निष्कर्षात्मक बोलतात. यातून त्यांची बहिर्मुखता दिसून येते आणि मनमोकळेपणाऐवजी प्रतिक्रियात्मक बोलणे चालू होते. त्यामुळे संवाद न घडता विसंवाद घडून साधकांच्या साधनेची हानी होते.
अशा वेळी सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांनी दिलेला दृष्टीकोन महत्त्वाचा आहे, ‘साधकांनी ‘मनमोकळेपणे बोलणे’ यामागचा दृष्टीकोन समजून घेऊन बोलायला हवे. साधकाने मनमोकळेपणे बोलल्यावर इतरांनीही त्याच्याविषयी चुकीचा ग्रह करून घेऊ नये, तर त्याला समजून घ्यावे, म्हणजे पुढे तो साधक आणखी मनमोकळेपणे बोलू शकेल !’
३. साधकांनी मोकळेपणाने बोलण्यासाठी योग्य आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण निवडून त्यांच्याशी आध्यात्मिक स्तरावर मैत्री करावी !
साधकांनी संत किंवा उत्तरदायी साधक यांना विचारून ‘योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन देऊ शकतील आणि साधनेत साहाय्य करतील’, अशी मैत्रीण किंवा मित्र निवडावा. त्यांच्याशी मनमोकळेपणाने अन् शिकण्याच्या स्थितीत राहून बोलावे. ही आध्यात्मिक मैत्री साधनेच्या प्रयत्नांना दिशा देणारी, संघर्षाशी लढायला शिकवणारी, तसेच आत्मविश्वास वृद्धींगत करणारी असावी. ‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण यांच्या माध्यमातून गुरुदेवच मार्गदर्शन करत आहेत’, असा भाव ठेवून ऐकले, तर प्रयत्न करणे सोपे होते आणि संघर्षाची तीव्रता न्यून होऊ लागते.’
– सुश्री (कु.) वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२३)