सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजदेयकांची ३३ कोटी रुपये थकबाकी !
वीजदेयक भरून सहकार्य करण्याचे महावितरणचे आवाहन
सिंधुदुर्ग – विजेचा वापर केल्यानंतरही त्याच्या वीजदेयकांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सेवा, अशा स्वरूपाच्या ७५ सहस्र १९३ ग्राहकांकडे ३३ कोटी ६० लाख रुपये थकबाकी झाली आहे. यामुळे जिल्ह्यात वीजदेयक न भरणार्या ६४५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण (महावितरण) आस्थापनाच्या कोकण परिमंडळाकडून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ सहस्र ३८७ घरगुती वीजग्राहकांकडे ९ कोटी २१ लाख रुपये, ५ सहस्र ८११ व्यावसायिक ग्राहकांकडे २ कोटी ८५ लाख रुपये, ८११ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ८३ लाख रुपये, पथदिवे सेवा देणार्या २ सहस्र ५७२ ग्राहकांकडे १२ कोटी ८ लाख रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्या १ सहस्र २९७ ग्राहकांकडे ५ कोटी ११ लाख रुपये आणि २ सहस्र ३१५ सार्वजनिक सेवा ग्राहकांकडे २ कोटी ५२ लाख रुपये, अशी एकूण ३३ कोटी ६० लाख रुपये थकबाकी आहे. वीजदेयकांची वसुली होण्यावरच महावितरणचा डोलारा अवलंबून आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू आणि थकित वीजदेयकांचा त्वरित भरणा करावा आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकामहावितरणची सेवा सुरळीत रहाण्यासाठी वीजग्राहकांनी वेळच्या वेळी वीजदेयक भरले पाहिजे अन्यथा कोट्यवधींच्या थकबाकीमुळे महावितरणचा डोलारा कधीही कोसळू शकतो ! |