म्हादई आणि झुआरी नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकाकडून ९५ कोटी २३ लाख रुपये संमत !
पणजी – नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘नमामी गंगे’ या केंद्र सरकारच्या उपक्रमाखाली गोव्यातील मांडवी आणि झुआरी या दोन नद्यांची निवड करण्यात आली असून या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने ९५ कोटी २३ लाख रुपये निधी संमत केला आहे; परंतु आतापर्यंत त्यातील केवळ २८ कोटी ९३ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती जलशक्ती मंत्रालयाने दिली आहे. राज्यसभेत उपस्थित प्रश्नाला उत्तर देतांना केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी म्हणाले, ‘‘नमामी गंगे’ या उपक्रमाखाली राष्ट्रातील पाण्याच्या दर्जावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ देखरेख ठेवतात. ‘नमामी गंगे’ या उपक्रमाखाली आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी भारत सरकारकडून १० सहस्र ७७५ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. त्यामध्ये नद्यांचे संवर्धन करण्याच्या आराखड्यासाठी १ सहस्र २४४ कोटी रुपये संमत केले आहेत. त्यामधील ९५ कोटी २३ लाख रुपये गोवा राज्यासाठी संमत करण्यात आले आहेत. गोवा सरकारने मांडवी आणि झुआरी या दोन्ही नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी २८ कोटी ९३ लाख रुपये खर्च करून नदीच्या बाजूला १२.५० एम्.एल्.डी. (प्रक्रिया केलेले सांडपाणी मोजण्याचे एकक) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत; मात्र मांडवी नदीचा आमोणा परिसरातील भाग आणि झुआरी नदीचा पंचवाडी ते मडकईपर्यंतचा भाग बर्याच प्रमाणात प्रदूषित आहे, असा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.
म्हादई सभागृह समितीची बैठक १० जानेवारीला
पणजी, २४ डिसेंबर (वार्ता.) – म्हादईशी संदर्भातील प्रश्नांविषयी म्हादई सभागृह समितीची २७ डिसेंबर २०२४ या दिवशी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून ही बैठक आता १० जानेवारी २०२५ या दिवशी सकाळी ११ वाजता पर्वरी येथील विधानसभा संकुलातील पी.ए.सी. खोलीमध्ये होणार आहे. या समितीची पहिली बैठक फेब्रुवारी २०२३ मध्ये झाली होती.
१२ सदस्य असलेल्या या सभागृह समितीमध्ये भाजप, काँग्रेस, मगो पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष, आप आणि रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदार आहेत.