सासोली येथे सामायिक भूमीची मोजणी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पूर्ण केली
“ग्रामस्थांचा विरोध” आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाची
दोडामार्ग – ‘जोपर्यंत भूमीचा पोटहिस्सा ठरत नाही, तोपर्यंत आमच्या भूमीची मोजणी करायची नाही’, अशी भूमिका घेत तालुक्यातील सासोली येथील सामायिक भूमीची मोजणी करण्यासाठी २३ डिसेंबरला आलेल्या अधिकार्यांना स्थानिक ग्रामस्थांनी रोखले आणि स्वत:चे हात बांधून घेऊन तेथेच ठिय्या आंदोलन केले; मात्र हा विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात संबंधित अधिकार्यांनी अखेर मोजणी पूर्ण केली.
सासोली येथील ‘ओरिजीन आस्थापना’ने खरेदी केलेल्या भूमीची पोट हिस्सा प्रशासकीय मोजणी प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने भूमीची मोजणी करण्यासाठी हे अधिकारी आले होते. या वेळी अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली असता पोलिसांनी हस्तक्षेप केला. या वेळी ग्रामस्थांनी पोलीस, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.
मोजणीला विरोध करणार्या ग्रामस्थांनी ‘आमचा विरोध डावलून मोजणी कराल, तर आम्ही आत्महत्या करू’, असा पवित्रा घेतला होता, तर मोजणी करण्याच्या बाजूने असलेल्या व्यक्तींनी, ‘आम्ही कायदेशीररित्या भूमी खरेदी केल्या आहेत. त्यासाठी कायदेशीर मोजणी प्रक्रियेची मागणी केली आहे. असे असतांना कोण नाहक विरोध करत असेल आणि मोजणी थांबवत असेल, तर आम्हालाही आत्महत्या करावी लागेल’, अशी भूमिका घेतली. अखेर नियमानुसार प्रशासनाने विरोधाकडे दुर्लक्ष करून मोजणी प्रक्रिया पूर्ण केली. नाईलाजास्तव मोजणीला विरोध असणार्या ग्रामस्थांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात अधिकार्यांना दिले.
या वेळी ओरिजीन आस्थापनाच्या अधिवक्त्याने,‘भूमी मोजणीची सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण केले आहेत. जर आम्ही चुकीचे केले असेल, तर तुमचे आक्षेप नोंदवा. तुमच्या मागण्या सामंजस्याने मांडा. आम्ही नियम डावलून इथे काहीही करत नाही’, अशी भूमिका स्पष्ट केली.
सासोली येथील सामायिक भूमीवरून यापूर्वीही वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भूमीविषयी नेमकी भूमिका घोषित केल्यास या प्रकरणातील सत्य सर्वांना समजेल, अशी चर्चा येथे चालू होती.