पुणे महापालिका ओढे-नाले, कालवे यांवरील पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करणार !
पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागांतील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधले; मात्र संबंधित पुलांची स्थिती नेमकी काय आहे ? याची आतापर्यंत पहाणी झालेली नाही. त्यामुळे संबंधित पुलांची सद्यःस्थिती काय आहे ? त्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतील ? यासंदर्भात संबंधित पुलांचे महापालिकेकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ (रचनात्मक परीक्षण) केले जाणार आहे. शहरात आंबील ओढा, भैरोबा नाला यांसह अनेक मोठे नाले-ओढे आहेत. यासमवेत मुठा डावा कालवासुद्धा शहरातून ग्रामीण भागामध्ये जातो. संबंधित नाले, ओढे, कालव्यांवर महापालिका प्रशासनाकडून अनेक वर्षांपूर्वी छोटे-मोठे पूल बांधण्यात आले. या पुलांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.
महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले की, ओढे-नाले आणि कालवे यांवरील पूल सध्या चालू आहेत; मात्र या पुलांची नेमकी काय स्थिती आहे ? हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यातून पुलाची डागडुजी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारे धोके टाळणे शक्य होईल. त्यादृष्टीने या पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे काम केले जाणार आहे. महापालिकेने २ वर्षांपूर्वी नदीवरील ३८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. पुलांची कामे करण्यासाठी महापालिकेने ३५ कोटी रुपयांचे प्रावधान केले होते. त्यातून विशेष प्रकल्प विभागाने ११ पुलांची कामे केली, तर आता उर्वरीत २७ पुलांच्या कामांसाठी अंदाजपत्रकात प्रावधान केले जाणार आहे.