गांधी घराण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षण यांना विरोध आहे ! – मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे बिंग उघड केल्याचा दावा !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेतील आरक्षण यांना देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू अन् दिवंगत इंदिरा गांधी, तसेच संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सर्व पुराव्यांसह जगासमोर आणले. त्यामुळे काँग्रेस पक्ष अशा प्रकारे नाटक करायचे काम करत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे २४ डिसेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

१.  काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्वीट करून त्यांनी संसदेचा वेळ खराब केला आणि आता जनतेचा वेळही खराब करत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने क्षमा मागायला हवी.

२. संसदेत बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाचा पर्दाफाश केला आहे.

३. याच काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही निवडून येऊ दिले नाही. त्यांना जाणीवपूर्वक पाडले. एवढेच नाही, तर डॉ. आंबेडकरांचे ज्या ठिकाणी महानिर्वाण झाले, त्या इंदुमिलच्या जागेवर स्मारक व्हावे, यासाठी अनेक वर्षे आंदोलने करावी लागली; पण सुईच्या टोकाइतकी भूमीही काँग्रेस सरकारने दिली नाही.

४. मोदी पंतप्रधान आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ३ दिवसांमध्ये २ सहस्र कोटी रुपयांची भूमी राज्य सरकारला दिली. आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे.

५. लंडन येथे डॉ. बाबासाहेबांनी जिथे वास्तव्य केले, ते घर लिलावात निघाले होते. हे घर लिलावात जाऊ देऊ नका, अशी मागणी अनेक संघटनांनी काँग्रेसच्या सरकारकडे केली होती; परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. पुन्हा आमचे सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतले.

६. महु, दीक्षाभूमी, अलीपूर रस्ता अशा प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचे काम भाजप सरकारने केलेले आहे.

७. काँग्रेसला केवळ बाबासाहेबांचे नाव वापरायचे आणि त्यांचे नाव वापरून राजकारण करायचे आहे; मात्र काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना कधीही कुठलाही सन्मान दिलेला नाही. बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ पुरस्कारही काँग्रेसने दिलेला नाही.

८. बीड येथील घटनेवरून विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे. देशातील कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र सुरक्षित आहे. प्रत्येक घटनेचे इतके राजकीयीकरण शोभत नाही. विरोधकांना जाती-जातीमध्ये विद्वेष सिद्ध करायचे आहेत. त्यांना तेवढेच काम आहे.