मंदिर न्यास परिषदेत संत, मंदिरांचे विश्वस्त आणि मान्यवर यांचे उद्बोधन

मंदिर न्यास परिषद पहिला दिवस

मंदिर महासंघाची चळवळ देशाला पुढे नेणारी आहे ! – भाऊसाहेब वाकचौरे, खासदार, ठाकरे गट

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक मंदिरे नूतनीकरणाची वाट पहात आहेत. त्यामुळे त्यांचे नूतनीकरण करावे, हे माझे स्वप्न होते. खासदार झाल्यानंतर मला वर्ष २००९ ते २०१४ या कालावधीत ५५० मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्यात यश मिळाले. निधर्मी देश असल्यामुळे मंदिरांच्या विकासात कायदे आणि नियम यांचा अडथळा येतो. त्यामुळे मंदिरांचा जीर्णाेद्धार नाही; पण सभामंडप बांधण्याच्या निमित्ताने ५५० मंदिरे उभी झाली.

शिर्डी मतदारसंघ हा ऐतिहासिक आहे. सरकारच्या माध्यमातून मंदिर संस्कृतीचा उद्धार होत नाही. अंबामातेचे पांडवकालीन मंदिर आहे; पण ते सरकारच्या कह्यात आहे. सरकार स्वत: काही करत नाही आणि लोकांनाही काही करू देत नाही. त्यांनी या मंदिराची थोडीशी जरी डागडुजी केली, तर त्यांना नोटीस येते. अशा प्रकारची गंभीर अवस्था प्रशासनाची आहे. आपण चालू केलेली ही चळवळ अत्यंत चांगली असून भविष्यात देशाला पुढे नेणारी आहे.

बांगलादेशी घुसखोर हे हिंदूंपुढील आर्थिक संकट ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर तेथे असलेली हिंदूंची ५१ टक्के लोकसंख्या सद्यस्थितीत ८ टक्क्यांपर्यंत न्यून झाली आहे. भारतात मात्र मुसलमानांची संख्या २२ टक्क्यांपर्यंत झाली आहे. या व्यतिरिक्त भारतात अनधिकृतरित्या १० कोटी मुसलमान रहात असल्याची निश्चित माहिती आहे. सुतारकाम, फळविक्री, भंगार, दूधविक्री यांसह सर्व यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीच्या क्षेत्रात मुसलमान व्यक्ती कार्यरत आहेत. बांगलादेशातून घुसखोरी करून आलेले मुसलमान ही कामे अल्प मूल्यामध्ये करत आहेत. भविष्यकाळात हिंदूंपुढील हे आर्थिक संकट आहे. बांगलादेशातील सर्वाधिक घुसखोर महाराष्ट्रात आहेत. मुसलमानांकडे जाणारा पैसा धर्मांतर, अवैध शस्त्रे खरेदी यांकडे जाण्याचा धोका आहे. त्यामुळे येत्या काळात हिंदूंनी हिंदूंशीच व्यापार करणे आवश्यक आहे. यासाठीच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’कडून ‘ओम प्रमाणपत्र’ची निर्मिती करण्यात आला आहे. यासह हिंदु कामगार मिळावेत, यासाठी लवकरच आम्ही ‘हिंदु वर्क फोर्स’ची (हिंदु कर्मचारी गटाची) निर्मिती करणार आहोत. यामध्ये हिंदू असतील, त्यांनाच नोकरी दिली जाईल. ‘हिंदु वर्क फोर्स’साठी लवकरच आम्ही ‘ॲप’ची निर्मिती करणार आहोत. यामध्ये हिंदु युवकांना नोंदणी करता येईल.

राष्ट्र आणि धर्म विषयक रणनीती मंदिरांमध्ये ठरवू ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

लोकसभेच्या निवडणुकीत धर्मांधांनी त्यांची रणनीती मशिदींमध्ये ठरवली. मतदान कुणाला करावे ? यासाठी फतवे काढले; मग हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविषयीची रणनीती मंदिरांमध्ये का निश्चित केली जाऊ नये ? या परिषदेला एकवटलेल्या सहस्रो विश्वस्तांनी रस्त्यावर उतरून मंदिर सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी मागणी केली, तर सरकारला मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करावीच लागतील. शेतातील बांधावरून एकमेकांची डोकी फोडणारे मंदिरे बळकावल्यानंतरही हिंदू गप्प आहेत. भारतात इंग्रजांनी वर्ष १९२७ मध्ये मंदिरांचे सरकारीकरण चालू केले; मात्र भारत स्वतंत्र झाल्यावरही मंदिरे स्वतंत्र झाली नाहीत. सद्यस्थितीत हिंदूंची अनुमाने ४ लाखांहून अधिक प्रमुख मंदिरे सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत आणि त्यांचा वापर केवळ आर्थिक लूट करण्यासाठी केला जात आहे. भारतावर इतकी इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमणे होऊनसुद्धा हिंदूंचे अस्तित्व टिकून राहिले, याचे एक प्रमुख कारण आहे मंदिरे अन् त्यांतील भक्तीपरंपरा, हे आहे. त्यामुळे प्रत्येक विश्वस्ताने ‘आपल्या मंदिरातून कोणत्या प्रकारे हिंदूसंघटन करता येईल ?’, त्याचा विचार करून कार्य केल्यास भविष्यात आपत्काळात हिंदूंना सुरक्षा देण्याचे कार्यही मंदिरांद्वारे करता येऊ शकते, असे आवाहन सुनील घनवट यांनी केले. मंदिर-न्यास परिषदेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

मंदिरे उत्पन्नाची नव्हेत, भक्तीची केंद्रे आहेत ! – संदीप सिंह, लेखक आणि मंदिर अभ्यासक

सध्या ‘टेंपल एकॉनॉमिक्स’ (मंदिर अर्थशास्त्र) हा शब्द वापरण्याची ‘फॅशन’ आहे. मंदिरात किती दान मिळाले ? मंदिराच्या जागा किंवा भूमी यांमधून किती उत्पन्न मिळाले ? यांवरून मंदिर ओळखले जाते. त्यामुळे अल्प उत्पन्न असलेल्या मंदिरांना पाडून तेथे इमारत किंवा व्यावसायिक संकुल बांधली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर हे उत्पन्न मिळवण्याचे साधन नाही, तर भक्तीचे केंद्र आहे, हे समजणे आवश्यक आहे.

धार्मिक पर्यटन आणि तीर्थयात्रा यांत पुष्कळ अंतर आहे. पर्यटन म्हणून मंदिराला भेट देणार्‍याला देवाचा लाभ होत नाही. मंदिरांच्या क्षेत्रात मद्यविक्री आणि मद्यपान यांवर बंदी हवी. तेथे पंचतारांकित हॉटेल उघडले, तरी तेथे मद्यविक्री नव्हे, तर तेथे सकाळ-संध्याकाळ सत्संग झाला पाहिजे, भजन-कीर्तन झाले पाहिजे. याची मागणी मंदिरांचे प्रतिनिधी आणि सर्व हिंदू यांनी करणे आवश्यक आहे. अलीकडे मंदिरांमध्ये प्रमुख अतिथींना (व्हीआयपी) दर्शन दिले जाते. रांग टाळण्यासाठी शंभर-पाचशे रुपये देणारा प्रमुख अतिथी होऊ शकत नाहीत. देश आणि धर्म दोन्ही एक आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व मंदिरातून होते. मंदिरे धर्माची वाहक आहेत. धर्माची स्थापनाही मंदिरातून होते. जोपर्यंत मंदिर आहे, तोपर्यंत धर्म आहे आणि तोपर्यंत देश आहे.

उपासना केंद्रांचे रक्षण प्रत्येक हिंदूचे दायित्व ! – प.पू. रमेशगिरी महाराज, मठाधिपती, नगर

मठ, मंदिरे, देवस्थान यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि त्यांचे संवर्धन यांसाठी महाराष्ट्र मंदिर परिषद अन् सनातन संस्था कार्यरत आहे. हिंदूंनी स्वत:पुरता विचार सोडून द्यावा. मंदिरे हिंदूंची सामूहिक उपासना केंद्रे आहेत. भजन, नामजप, प्रार्थना यांद्वारे मंदिरांतून सामूहिक उपासना केली जाते. मंदिरांचे भंजन हिंदु धर्मावरील घाला आहे. मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येऊन सनातन संस्कृतीचा ध्वज फडकवायला हवा. उपासना केंद्रांचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे सामूहिक दायित्व आहे.

मंदिरांनी धर्मरक्षणाचीही भूमिका घेण्याची आवश्यकता ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्राचीन काळापासून मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य मंदिरांच्या माध्यमातून झाले. मंदिरांद्वारे समाजाला एकसंध ठेवण्याची प्रक्रिया होत आहे. त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिराच्या माध्यमातून हिंदु समाजाचे जन्महिंदूंपासून कर्महिंदूमध्ये रूपांतर करण्याचे महत्कार्य होते. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत. त्यामुळे धर्मरक्षणाच्या संदर्भात मंदिरांमधून त्यांच्या क्षमतेनुसार कृती होणे अपेक्षित आहे. ही आधारशिला खर्‍या अर्थाने तेव्हाच ठरेल, जेव्हा मंदिरांमधून धर्मरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका घेतली जाईल आणि प्रबोधन केले जाईल. भाजपच्या प्रवक्त्त्या नुपूर शर्मा यांनी एक विधान केल्यावर मशिदींमधून ‘सर तन से जुदा’से फतवे निघाले. दुसरीकडे काही कालावधीनंतर तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्याचा मुलगा आणि मंत्री असलेल्या उदननिधी स्टॅलिनने सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरिया यांच्याशी तुलना केली. त्या वेळी त्यांच्या विरोधात हिंदु समाज एकजुटीने पुढे आला नाही. सनातन धर्माचे केंद्र म्हणून मंदिरांनी धर्मरक्षणाची भूमिका घ्यायला हवी. यापुढील काळात मंदिरांना धर्मशिक्षणाचे केंद्र बनवायचे असेल, तर धर्मशिक्षणासह धर्मरक्षणाचीही भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मंदिरांच्या विश्वस्तांनाही मंदिरे धर्माची केंद्रे होण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यांची समष्टी साधना होईल, असे मार्गदर्शन सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे कशी करावीत ?’ याविषयी केले.

मंदिरांच्या विश्वस्तांनी धर्मजागृती करावी ! – प्रदीप तेंडोलकर, अध्यक्ष, श्री जीवदानीदेवी मंदिर संस्थान

मंदिरांचे संवर्धन हे भगवंताचे कार्य आहे. त्यामुळे या कार्यासाठी ईश्वरानेच आपल्याला एकत्र आणले आहे. महाराष्ट्र मंदिर परिषदेच्या माध्यमातून मागील ३ वर्षे झालेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे. मंदिरे ही धर्मक्षेत्रे आहेत. याचे कारण आपण मंदिरांतून हिंदु धर्माच्या प्रचारासाठी अनेक उपक्रम राबवू शकतो. या परिषदेच्या माध्यमातून सर्व विश्वस्तांना व्यासपीठ प्राप्त झाले आहे. सनातन धर्मामध्ये मोठी शक्ती आहे. मंदिरांच्या विश्वस्तांनी हिंदु जागृतीचे महत्कार्य हाती घ्यावे.

मंदिरांचे वातावरण पवित्र ठेवण्याचे दायित्व विश्वस्तांचे ! – गिरीश शहा, अध्यक्ष, समस्‍त महाजन संघ, मुंबई

व्यवस्थापन चालवण्यासाठी सरकारने मंदिरे कह्यात घेतली असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे; परंतु भारतात प्राचीन काळापासून मंदिरांचे व्यवस्थापन चालू आहे. सरकारला काही विभाग चालवता येत नाहीत, ते मंदिरांचे व्यवस्थापन कसे करणार ? काही मंदिरांमध्ये अपप्रकार घडलेही असतील; परंतु त्यांतून सर्व मंदिरांविषयी अपसमज पसरवण्यात आला. मोगलांची भारतावर सत्ता येण्यापूर्वी इंग्रजांना भारतीय समाज हा येथील प्राचीन संस्कृतीवर आधारित असल्याचे समजले. त्यामध्ये मंदिरे ही महत्त्वाची आहेत, हे इंग्रजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मंदिरांची तोडफोड केली. हिंदूंची मंदिरे हीच गुरुकुले होती. मंदिरांमध्ये प्राचीन भारतीय शिक्षण दिले जात होते. सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यासाठी मंदिरांतील संस्कार आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये पवित्र वातावरण रहावे, याचे दायित्व आपले आहे. महाराष्ट्रात ४ लाखांहून अधिक मंदिरे आहेत. महाराष्ट्रात ४० ते ४५ सहस्र गावे आहेत. याचा विचार केल्यास प्रत्येक गावात १० ते १५ मंदिरे सहज आहेत. ही सर्व मंदिरे धर्मजागृतीची केंद्रे होतील, यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

श्री भवानीदेवीच्या मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता संजीव देशपांडे यांचा सत्कार !

अधिवक्ता संजीव देशपांडे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अभय वर्तक, पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात यशस्वी न्यायालयीन लढा देणारे छत्रपती संभाजीनगर येथील अधिवक्ता संजीव देशपांडे यांचा ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’च्या वतीने सत्कार करण्यात आला. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. अधिवक्ता संजीव देशपांडे यांनी केंद्र सरकारचे साहाय्यक शासकीय अधिवक्ता म्हणून काम केले आहे. २ वर्षांपासून त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने ‘डेसिंगनेट सिनीअर कौन्सिल’ (उच्च न्यायालयाचे नियुक्रत केलेले वरिष्ठ अधिवक्ता) म्हणून घोषित केले आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री भवानीदेवीच्या मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी नि:शुल्क खटला लढला.

श्री भवानीदेवीच्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांना खडी फोडायला पाडवू ! – अधिवक्ता संजीव देशपांडे, मुंबई उच्च न्यायालय

श्री तुळजाभवानी मंदिरासाठीचा न्यायालयीन लढा पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी यांनी चालू केला. त्यात मी खारीचे योगदान दिले. श्री भवानीदेवीच्या कृपेने मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या सर्व भ्रष्टाचार्‍यांना खडी फोडायला पाठवू. मला अशी अनेक प्रकरणे ठाऊक आहेत की, ज्यामध्ये वक्फ मंडळाने मंदिराच्या जागेवर दावा सांगितला आहे. मंदिरे ही आध्यात्मिक ऊर्जेचे स्रोत आहेत. मंदिर महासंघाच्या माध्यमातून अनेक धर्मबांधव मंदिरांच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत. अशा प्रकारे एकत्रित लढा दिल्यास या देशात पुन्हा एकदा हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असे मनोगत अधिवक्त संजीव देशपांडे यांनी सत्काराच्या वेळी व्यक्त केले.

मंदिर न्यास परिषदेच्या प्रथम दिवशी उपस्थित मान्यवर

श्री भीमाशंकर संस्थानचे श्री. सुरेश कौदरे, माजी सह धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, श्री विघ्नहर गणपति देवस्थान ट्रस्ट, ‘ओझर’चे उपाध्यक्ष श्री. तुषार शिवराम कवडे, खजिनदार श्री. दत्तात्रय सीताराम कवडे, विश्वस्त श्री. संतोष रामदास कवडे, विश्वस्त सौ. शिल्पाताई सुरेश जगदाळे, व्यवस्थापक श्री. अशोक देवराम घेगडे, जेजुरीचे विश्वस्त श्री. राजेंद्र खेडे, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या सौ. संगीताताई ठकार, रांजणगाव देवस्थानचे विश्वस्त श्री. तुषार पाटील

मंदिर परिषदेच्या सभागृहाबाहेर सिद्ध करण्यात आलेला ‘सेल्फी पॉईंट’ !

विश्वस्त आणि मंदिरांचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला.