थोडक्यात महत्त्वाचे
इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग !
मुंबई – येथील वांद्रे (पश्चिम) येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर २४ डिसेंबरच्या पहाटे भीषण आग लागली होती. आगीनंतर इमारतीतील ८० वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या महिलेची प्रकृती गंभीर आहे. अग्निशमन विभागाने १० गाड्या पाठवून आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मानखुर्दमध्ये आगीत ६-७ गोदामे जळून खाक !
मानखुर्द – येथील भंगाराच्या गोदामांना सायंकाळी ७ वाजता भीषण आग लागली होती. सुदैवाने या आगीत कुणीही घायाळ झाले नाही; मात्र ६ – ७ गोदामांची हानी झाली आहे.
२६ ते २८ डिसेंबर या काळात पाऊस पडणार !
मुंबई – हवामान विभागाने २६ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर या दिवशी कान्हादेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी आणि २८ डिसेंबर या दिवशी कान्हादेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे) आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
लोकलमधील स्वयंचलित उद्घोषणांमधून चुकीच्या उद्घोषणा !
कल्याण – मुंबई सी.एस्.एम्.टी. ते कल्याण लोकलमध्ये दुपारी स्वयंचलित दर्शक यंत्रणेतून रेल्वेस्थानकांच्या नावांच्या चुकीच्या उद्घोषणा करण्यात येत होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ झाला. लोकल धावत होती कल्याणच्या दिशेने आणि लोकलमधील स्वयंचलित उद्घोषकांकडून मात्र कळवा स्थानकाचा कांजूरमार्ग स्थानक, मुंब्रा स्थानकाचा नाहूर, दिवा स्थानकाचा भांडुप, कोपरचा मुलुंड स्थानक असा उल्लेख करण्यात येत होता.
भिवंडीत दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी संप्रेरकांचा वापर !
दोघांना अटक
ठाणे – भिवंडीतील अवैधरित्या संप्रेरकांचा (हार्मोन्सचा) वापर गायी-म्हशी यांच्या दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी केला जात आहे. अशा प्रकारच्या दुधाचे सेवन केल्यास दृष्टीहीनता, गर्भपात, त्वचेचे आजार अशा गंभीर आजारांला सामोरे जावे लागू शकते. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आरोपी अशिक्षित आहेत.
संपादकीय भूमिका : जनतेच्या आरोग्याशी खेळणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !