तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना त्यातून बाहेर पडण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर प्रयत्न करणारी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. कल्याणी गांगण !

‘तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांनाही कु. कल्याणी गांगण हिची अभ्यासू वृत्ती किती होती, हे सर्वांनी या लेखातून शिकण्यासारखे आहे.’

 –  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले   

साधकांना साधना करतांना वाईट शक्ती विविध प्रकारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास देऊन त्यांचे खच्चीकरण करत असतात अन् साधकांना साधनेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. कल्याणी गांगण हिला झालेले तीव्र त्रास आणि त्यातही तिने परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

सुश्री (कु.) कल्याणी गांगण

१. सप्टेंबर २००३ ते २००५ मध्ये झालेले त्रास

सूक्ष्मातील युद्ध चालू झाल्यावर ४ महिन्यांत माझी स्थिती अत्यंत कठीण झाली होती. त्या स्थितीतून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला बाहेर काढले आहे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘तुझ्यासारखा त्रास कुणालाही होऊ नये. यातून बाहेर पडण्यासाठी तुला अडीच वर्षे लागतील.’’ मलाही असेच वाटत होते, ‘मला जसा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होतो. तसा जगात कुणालाच होऊ नये.’ प्रत्यक्षातही सप्टेंबर २००५ च्या शेवटी मला मिरज आश्रमातील सेवा दायित्व घेऊन करता येऊ लागल्या.

२. वर्ष २००६ ते २००७

२ अ. आध्यात्मिक त्रासामुळे सतत बेशुद्ध पडत असतांनाही १ वर्ष प्रतिदिन १२ घंटे नामजपाचे उपाय करणे : वर्ष २००६ ते २००७ मध्ये मला आध्यात्मिक त्रासामुळे कोणतीच सेवा करता येत नसे. मी सतत बेशुद्ध पडायचे. मी चालता चालता चक्कर येऊन पडायचे. मला सतत पित्ताच्या उलट्या व्हायच्या. या त्रासांसाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला १२ घंटे नामजपाचे उपाय करायला सांगितले होते. मी हे उपाय १ वर्ष केल्यावर यातून बाहेर पडले. त्यानंतर २००७ मध्ये मी प्रसाद भांडारात सेवा करू लागले.

२ आ. नैराश्य आल्यावर ‘सध्या वर्तमानकाळात रहाणे आणि गुरुदेव सांगतील, ते करत रहाणे’, असा विचार केल्यावर मन हलके होणे : आता स्थुलातील लढा चालू होणार असल्याने पुन्हा माझी स्थिती खालावली. या वेळी माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरच मला यातून बाहेर काढतील’, असा विचार येत होता. ‘वर्ष २००३ मध्ये मला त्रासातून बाहेर पडण्यासाठी अडीच वर्षे लागली. आताही मला ३ वर्षे लागतील’, या विचाराने मी थोडी निराश झाले. तेव्हा मी विचार केला, ‘लढा कसा असेल ?’, हे मला ठाऊक नाही. ‘सध्या वर्तमानकाळात रहाणे आणि गुरुदेव सांगतील, ते करत रहाणे’, एवढेच माझ्या हातात आहे’, असा विचार केल्यावर माझे मन हलके झाले.

३. जानेवारी २०२० 

३ अ. स्वतःचे अस्तित्व न जाणवणे आणि वाईट शक्तींच्या आक्रमणाला सतत बळी पडणे : ‘जानेवारी २०२० मध्ये माझी आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढली होती. या त्रासामुळे मला माझे अस्तित्वच जाणवत नव्हते. ‘यानंतर मी काहीच करू शकणार नाही’, असे मला वाटत होते. साधनेत नवीन असल्यासारखी माझी स्थिती झाली होती. ‘मला काहीच येत नाही’, असे मला वाटायचे. प्रत्यक्षातही मला साधनेचे सर्व प्रयत्न आरंभापासून करावे लागले. काळानुसार वाईट शक्तींचे प्राबल्य वाढत असल्यामुळे त्यांच्या आक्रमणाला मी सतत बळी पडत होते.

३ आ.  मनात शुष्कता जाणवून ‘स्वतःमध्ये काहीच भाव नाही’, असा विचार येणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी एखादी सेवा सांगितल्यावर ‘ती कशी करायची ?’, असा मला विचार करावा लागत होता. सेवा सांगितल्यावर मी अंतर्मुख होऊन विचार करायचे. तेव्हा मला मनात शुष्कता जाणवायची आणि माझ्या मनात ‘माझ्यात काहीच भाव नाही’, असा विचार यायचा.

(क्रमश:)

– कु. कल्याणी गांगण (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/867016.html