सतत नामानुसंधानात राहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मन जिंकणार्या सनातनच्या ६४ व्या संत पू. (कै.) शेऊबाई लोखंडेआजी (वय १०० वर्षे) !
१. ‘रामनाथी आश्रमात यायला मिळावे’, यासाठी पुष्कळ नामजप करणे
‘वर्ष २०१६ मध्ये पू. आजी प्रथमच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येणार होत्या. तेव्हा त्या गोव्याला जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आल्यावर काही कारणाने अकस्मात् त्यांचे आश्रमात जाणे रहित झाले. त्या वेळी पू. आजी म्हणाल्या, ‘‘माझा नामजप अजून पुष्कळ व्हायला हवा; म्हणून गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला अजून आश्रमात बोलावले नाही.’’ तेव्हा त्यांच्या मनात नकारात्मक विचार आला नाही. त्यानंतर त्यांनी पुष्कळ नामजप केला आणि पुढील मासात त्या रामनाथी आश्रमात आल्या.
२. कुटुंबियांना सेवा करता यावी; म्हणून पणतीला सांभाळणे
पू. आजी आश्रमात आल्या. तेव्हा त्यांचे वय साधारण ९२ वर्षे होते. त्यामुळे त्यांना धान्य निवडणे किंवा इतर काही सेवा करता आल्या नाहीत. त्या वेळी पू. आजींची पणती कु. वेदश्री भुकन ही ३ वर्षांची होती. पू. आजी वेदश्रीला सांभाळायच्या. त्यामुळे अन्य कुटुंबियांना पूर्णवेळ साधना करता आली. पू. आजी वेदश्रीला घेऊन नामजप करत आणि ध्यानमंदिरात आरतीला जात असत. वेदश्री मोठी झाल्यावर त्यांनी त्यांचे पूर्ण लक्ष नामजपावर केंद्रित केले.
३. नामजप करण्याची तळमळ
पू. आजींना कोणताच जप पूर्ण म्हणता येत नव्हता. त्या ‘श्री गुरुदेव दत्त ।’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, असा नामजप न करता ‘दत्त, दत्त’, ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप करत असत. त्यांना ‘शून्य’ हा जप फार आवडायचा; कारण तो म्हणायला सोपा आहे.
४. एकाग्रतेने नामजप करून ध्यानावस्था अनुभवणार्या पू. लोखंडेआजी !
एकदा पू. आजी खोलीत नामजप करत बसल्या होत्या. त्यांना पाहिल्यावर ‘त्यांचे मन पूर्णपणे एकाग्र झाले असून त्या ध्यानावस्थेत आहेत’, असे मला जाणवले. मी खोलीत त्यांच्या बाजूला येऊन बसलो, तरी त्यांना ते समजले नव्हते. त्यांची ध्यानावस्था पाहून माझी भावजागृती झाली.
५. सनातनचे तीन गुरु आणि साधक यांच्यासाठी नामजप अन् प्रार्थना करणे
वर्ष २०१६ ते २०२४ या कालावधीत त्यांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना केली. या कालावधीत त्यांनी समष्टीसाठी आणि हिंदु राष्ट्रासाठी नामजप केला.
पू. आजी मला सांगत, ‘‘मी श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांना प्रार्थना करत असते, ‘अंजनाकाकूंचा (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पू. आजी ‘अंजनाकाकू’ म्हणत असत.) दौरा चांगला होऊ दे. त्यांना कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या समवेत असणार्या साधकांची प्रकृती चांगली ठेवा.’’ त्या प.पू. गुरुदेव, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी नियमित १ घंटा नामजप करत असत. त्या अधूनमधून ‘साधकांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांना सेवा करण्यासाठी शक्ती मिळावी’, यांसाठी प्रार्थना करत असत.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
पू. आजींचे हे उदाहरण आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्याला देहाने सेवा करणे शक्य होत नसेल, तर त्याच विचारात न रहाता आपण जप करून गुरूंचे मन जिंकू शकतो. पू. आजी त्यांच्या कृतीतून साधक आणि कुटुंबीय यांच्या समोर आदर्श निर्माण करून गुरूंच्या चरणी विलीन झाल्या. सतत गुरुस्मरणात राहून गुरूंच्या चरणी समर्पित झालेल्या पू. आजींच्या चरणी आम्ही भावपूर्ण नमस्कार करतो. त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.
पू. आजींसारख्या संतरत्नाच्या सेवेच्या माध्यमातून आमची साधना करून घेणारे प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी मी कृज्ञतापूर्वक नमस्कार करतो. या सेवेत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, तर मी गुरूंच्या चरणी क्षमायाचना करतो. ‘आमच्यावर तुम्हा सर्वांची अखंड कृपा राहो’, अशी मी प्रार्थना करतो.’
– श्री. वाल्मीक भुकन (पू. लोखंडेआजी यांचा नातू (मुलीचा मुलगा)), कांचीपूरम्, तमिळनाडू. (१८.१२.२०२४)
पू. आजींनी गुरूंना नामजप अर्पण केल्याने त्यांनी पू. आजींच्या देहाचे सोने केले !
‘पू. आजींच्या अंत्यविधीच्या वेळी एक विधी करत असतांना सोन्याचे लहानसे तुकडे त्यांचे डोळे, चेहरा इत्यादी वेगवेगळ्या अवयवांवर ठेवले होते. हे मी माझ्या आईला (श्रीमती इंदुबाई भुकन (पू. आजींची मुलगी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५९ वर्षे) यांना)) सांगितले. तेव्हा ती म्हणाली,
‘‘पू. आजींनी गुरूंना नामजप अर्पण केला आणि गुरूंनी पू. आजींना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. गुरुदेवांनी माझ्या आईच्या देहाचे सोने केले.’’
– श्री. वाल्मीक भुकन, कांचीपूरम्, तमिळनाडू. (१८.१२.२०२४)
मायेची आसक्ती नसल्याने गुरूंकडे आपला मृत्यू सहजतेने मागणार्या पू. लोखंडेआजी !
‘एकदा आम्हाला प.पू. गुरुदेवांचा सत्संग लाभला. तेव्हा पू. आजी प.पू. गुरुदेवांना म्हणाल्या, ‘‘माझे वय पुष्कळ झाले आहे. त्यामुळे मला वाटते, ‘आता मी देह ठेवावा.’ त्यावर प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘अजून तुम्हाला कार्य करायचे आहे. हिंदु राष्ट्रासाठी तुम्हाला थांबायचे आहे.’’ यावर पू. आजी म्हणाल्या, ‘‘बरं. तुम्ही सांगाल तसे !’’ त्यानंतर २ – ३ वर्षे त्यांनी हा विषय काढला नाही. नंतर त्यांनी गुरुदेवांना याविषयी पुन्हा विचारले. तेव्हाही गुरुदेवांनी वरील उत्तर दिले. त्या दोघांचे हे बोलणे सहजतेने होत असे.
पू. आजींच्या बोलण्यावरून ‘त्या गुरूंजवळ किती सहजतेने आपला मृत्यू मागत होत्या !’, असे मला वाटले. त्यांना मृत्यूची जराही भीती वाटत नव्हती. सामान्य माणूस मृत्यू येऊ नये; म्हणून प्रयत्न करत असतो. त्याला त्याच्या कुटुंबासह जगायचे असते; पण पू आजी संत असल्यामुळे त्यांना मायेतील गोष्टी नको होत्या.’
– श्री. वाल्मीक भुकन, कांचीपूरम्. (१८.१२.२०२४)