Bengaluru Swingers Racket : प्रेयसींची अदलाबदल करणारी टोळी गुन्हे शाखेकडून उघड : २ आरोपींना अटक

अटक करण्यात आलेले आरोपी

बेंगळुरू – केंद्रीय गुन्हे शाखेने प्रेयसींची अदलाबदल करणार्‍या टोळीच्या कारवाया उघड केल्या आहेत. या प्रकरणी एका महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. ‘या विकृत खेळात मला बलपूर्वक सामील करून घेण्यात आले. इतर व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर माझी काही अश्‍लील छायाचित्रे दाखवून मला धमकावण्यात आले’, असेही या महिलेने सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

१. तक्रार करणार्‍या तरुणीने सांगितले, ‘मला माझ्या मित्राने त्याच्यासोबत आणि त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते.’ या तक्रारीनंतर केंद्रीय गुन्हे शाखेने या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले. पोलिसांनी या टोळीकडून अनेक महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओ जप्त केले आहेत.

२. पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, आरोपी बेंगळुरूच्या बाहेरील भागात ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स’द्वारे ‘पार्टी’ आयोजित करायचे. या ‘पार्ट्यां’मधून जोडप्यांना जोडीदार अदलाबदल करण्यास भाग पाडले जायचे.

३.  या प्रकरणी सध्या हरीश आणि हेमंत या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना सराईत गुन्हेगार घोषित केले आहे. या दोघांचा यापूर्वीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांत सहभाग होता. या आरोपींनी यापूर्वीही अनेक महिलांना ‘ब्लॅकमेल’ केल्याचे पोलिसांनी सांगितले.


जोडीदार अदलाबदल म्हणजे काय ?

सध्या मोठ्या शहरांमध्ये जोडीदार अदलाबदलीसाठी पार्ट्या आयोजित केल्या जातात. यामध्ये प्रेमीयुगुल सहभागी होती. त्यात ही प्रेमीयुगुले स्वेच्छेने एकमेकांचे जोडीदार अदलाबदल करून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. हल्ली विवाहित तरुण-तरुणींमध्येही असले प्रकार दिसून येत आहेत. असले प्रकार स्वेच्छेने होत असले, तरी बहुतांश वेळा तरुणींवर दबाव आणूनही त्यांना इतरांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते.

संपादकीय भूमिका

समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे अशा प्रकारातून दिसून येते. असे प्रकार थांबण्यासाठी आणि समाज नीतीवान बनण्यासाठी साधना करणे आवश्यक !