Mahakumbh Punya Kshetra Yatra : प्रयागराज, अयोध्या आणि काशी येथे जाण्यासाठी रेल्वे विभागाकडून विशेष यात्रेचे आयोजन !
प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
नवी देहली – प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्या महाकुंभपर्वानिमित्त रेल्वे विभागाने भाविकांना प्रयागराज, अयोध्या आणि काशी येथे जाण्यासाठी ‘महाकुंभ पुण्य क्षेत्र यात्रा’ नावाच्या विशेष यात्रेचे आयोजन केले आहे. भाविकांना महाकुंभपर्वात स्नान करता यावे, तसेच अयोध्या आणि काशी येथे दर्शन घेता यावे, यासाठी ही योजना आणण्यात आली असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. २३ जानेवारीपासून या यात्रेस प्रारंभ होणार आहे. ६ रात्र आणि ७ दिवस चालणार्या या यात्रेत भाविकांची खाण्या-पिण्यासह रहाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
प्रति व्यक्ती येणार २० सहस्र ९०५ रुपये खर्च !
या यात्रेसाठी भाविकांना आरक्षण करावे लागणार आहे. रेल्वेच्या शयनयान डब्याचे आरक्षण केल्यास २० सहस्र ९०५ रुपये, तर एसी डब्याचे आरक्षण केल्यास २८ सहस्र ३५० रुपये खर्च येणार आहे. ही रक्कम ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनुक्रमे १९ सहस्र २५० रुपये आणि २६ सहस्र ५५५ रुपये इतकी असेल. या यात्रेचे आरक्षण करण्यासाठी भाविक ९२८१०३०७३९, ९२८१०३०७२५ किंवा ९२८१४३६२८० या क्रमांकावर संपर्क करू शकतात, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.