Swami Ramdev On Hindu Temples : आपली मोठी तीर्थक्षेत्रे आणि प्रतिके असणार्या स्थळांविषयी निर्णय घ्यायला हवा ! – योगऋषी रामदेवबाबा
हरिद्वार (उत्तराखंड) – मुसलमान आक्रमकांनी भारतात येऊन आमची मंदिरे, आमची धार्मिक स्थळे आणि आमची अस्मिता असणारी प्रतिके नष्ट केली, हे खरे आहे. आपली सनातन मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती उद्ध्वस्त करण्यात आल्या. आता अशांना किती शिक्षा करायची किंवा नाही, हे न्यायपालिकेचे काम आहे. पापी लोकांना त्यांच्या पापांची फळे भोगावी लागतील. आपली मोठी तीर्थक्षेत्रे आणि प्रतिके असणार्या स्थळांविषयी निर्णय घ्यायला हवा, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी केले. ते हरिद्वार येथील गुरुकुल कांगरी विद्यापिठात आयोजित स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांच्या ९९ व्या हुतात्मा दिन सोहळ्यात बोलत होते. त्यांनी ‘संपूर्ण देशात गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे’, असेही या वेळी सांगितले.
सनातन धर्म नष्ट करू पहाणार्यांना धडा शिकवला पाहिजे !
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या ‘मंदिर-मशीद वादातून काही लोक हिंदूंचे नेते बनत आहेत’ या विधानावर रामदेवबाबा म्हणाले की, सरसंघचालकांचे ते वैयक्तिक विधान आहे आणि अनेक संतही यावर विधाने करत आहेत; पण जे सनातन धर्म नष्ट करू पहात आहेत, त्यांना धडा शिकवला पाहिजे.