Israel Accepts Hamas Chief Killing : आम्ही हमास प्रमुख हनिये याला ठार केले !
इस्रायलने ६ मासांनंतर दिली स्वीकृती
तेल अविव (इस्रायल) – ज्याप्रमाणे आम्ही हनिये आणि सिनवार यांना ठार मारले आहे, त्याचप्रमाणे आम्ही हुती बंडखोरांनाही ठार करू, अशी चेतावणी देतांना इस्रायलचे संरक्षणमंत्री कॅट्झ यांनी हमासचा प्रमुख हनिये याला ठार केल्याचे ६ मासांनंतर मान्य केले. हनिये याचा मृत्यू इराणची राजधानी तेहरानमधील एका इमारतीच्या खोलीमध्ये स्फोट झाल्याने झाला होता. यामागे इस्रायल असल्याचा दावा केला जात होता; मात्र याविषयी इस्रायलने आतापर्यंत कोणतेच विधान केले नव्हते.
हुती बंडखोरांचाही पराभव करू ! – इस्रायल
संरक्षणमंत्री कॅटझ यांनी ‘येमेन येथील हुती बंडखोरांनी इस्रायलवर आक्रमण केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार’, अशी धमकी दिली. ते म्हणाले, ‘‘आम्ही हमासचा पराभव केला आहे, हिजबुल्लाला पराभूत केले आहे, त्याचप्रमाणे आम्ही हुती बंडखोरांनाही पराभूत करू.’’ कॅटझ यांनी हुतीच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याची आणि त्यांच्या नेत्यांचा शिरच्छेद करण्याची धमकीही दिली. हुती बंडखोर गेल्या १ वर्षापासून इस्रायलवर रॉकेट आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमण करत आहेत. यासह लाल समुद्रात इस्रायलच्या मालवाहू नौकांनाही लक्ष्य केले जात आहे.