भैरवनाथ आणि देवांचा प्रदक्षिणा सोहळा उत्साहात पार पडला !

सातारा, २३ डिसेंबर ( सें वार्ता.) – गोडोली येथील श्री भैरवनाथ आणि श्री जोगेश्वरीदेवीची ग्रामप्रदक्षिणा मोठ्या उत्साहात पार पाडली. सहस्रो भाविकांनी या मंगल सोहळ्यासाठी गर्दी केली होती. गोडोली येथील श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिरामध्ये भैरवनाथाची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा होत आहे. त्यापूर्वी पू श्री भैरवनाथ, श्री जोगेश्वरीदेवी, श्रीगणपति, श्री मारुति, श्री शनिदेव या देवतांच्या मूर्तींची गावातून वाद्य ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. देवस्थानाचे मानकरी शंकरराव मोरे-पाटील, अध्यक्ष भरत संकपाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून  मिरवणुकीला प्रारंभ झाला. या वेळी प्रदक्षिणा मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळी काढली होती. मिरवणुकीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्व पुरुष मंडळींनी पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर गांधी टोपी घालून मिरवणुकीची शोभा वाढवली. ठिकठिकाणी मिरवणुकीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.