रामेश्वर (तालुका देवगड) आंबा उत्पादन संशोधन उपकेंद्राचा कारभार सुधारण्यासाठी सरकारने गंभीरपणे लक्ष घालावे !

  • शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी हिवाळी अधिवेशनात केली मागणी

  • कोट्यवधी रुपये खर्चूनही संशोधन न झाल्याने संशोधन केंद्र पांढरा हत्ती ठरत असल्याचा आरोप

आमदार डॉ. मनीषा कायंदे

नागपूर – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वर, तालुका देवगड येथे असलेल्या ‘रामेश्वर आंबा उत्पादन संशोधन उपकेंद्रा’चा निष्क्रीय कारभार आणि आंबा उत्पादनाविषयी संशोधन करण्यात असलेली अनास्था यांविषयी शिवसेनेच्या नेत्या अन् आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या सूत्राच्या वेळी प्रश्न उपस्थित केला. ‘गेल्या १० वर्षांत या केंद्रात आंब्याविषयी कोणतेही संशोधन करण्यात आले तर नाहीच; मात्र वेतनापोटी ५ कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे या केंद्राची अनास्था आणि निष्क्रीयता झटकून आंबा उत्पादनाविषयी प्रभावी कृती होण्यासाठी राज्य सरकारने गंभीरपणे यात लक्ष घालावे’, अशी मागणी डॉ. कायंदे यांनी या वेळी केली.

या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘या उपकेंद्रात आंब्याविषयी संशोधन तर झाले नाहीच; मात्र निव्वळ वेतनावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हे केंद्र आता पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे सरकारने यात लक्ष घालून आंबा उत्पादनासाठी प्रभावी कृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे, तसेच उपयुक्त संशोधन करणेही आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने यात गंभीरपणे लक्ष घालावे.’’

हिंदु जनजागृती समितीने प्रथम उघड केला या केंद्राचा भोंगळ कारभार !

दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यपिठा’च्या अंतर्गत रामेश्वर (गिर्ये) येथे ३८ हेक्टर इतक्या प्रचंड भूमीवर हे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचा भोंगळ कारभार आणि आंबा संशोधनाविषयी असलेली अनास्था हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि काही स्थानिक आंबा बागायतदार यांनी देवगड येथे एक पत्रकार परिषद घेऊन नुकताच उघड केला होता. या वेळी ‘या केंद्राचा  कारभार सुधारून त्याचा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी राज्य सरकारने त्वरित प्रयत्न करावेत, अन्यथा आंबा उत्पादकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले’, अशी चेतावणी दिली होती. याला सर्व प्रसिद्धीमाध्यमांनीही चांगली प्रसिद्धी दिली होती.

हे वाचा – ↓↓↓

SINDHUDURG BreakingNews : गिर्ये, रामेश्‍वर (सिंधुदुर्ग) आंबा संशोधन केंद्रात १० वर्षांत संशोधनच नाही; मात्र वेतनावर ५ कोटी खर्च !