‘पुणे पुस्तक महोत्सवा’त यंदा पुस्तकविक्रीत चौपटीने वाढ !
पुणे – यंदाच्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त पुस्तकांच्या २५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या असून यंदाच्या महोत्सवात पुस्तक विक्री चौपटीने वाढून ४० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा २२ डिसेंबर या दिवशी समारोप झाला.
गेल्या वर्षीच्या महोत्सवात पुस्तकांची २५० दालने होती आणि ११ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा ६०० हून अधिक पुस्तक दालने होती. पुस्तक विक्रीतून ४० कोटी रुपयांची उलाढाल झाली. महोत्सवात साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, बालचित्रपट महोत्सव, स्पर्धा, कार्यशाळा असे विविध उपक्रम झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. पुणेकरांनी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला.
समारोपाच्या कार्यक्रमात महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले की, महोत्सवाला १० लाख लोकांनी भेट दिली. एक सहस्रांहून अधिक लेखक महोत्सवात सहभागी झाले. पुस्तकांद्वारे ४ विश्वविक्रम नोंदवले गेले. तरुणांनी आवर्जून पुस्तके खरेदी केली. त्यामुळे ‘आजचे तरुण वाचत नाहीत’, हा समज खोटा ठरला आहे, असेही राजेश पांडे यांनी सांगितले.