दिवाळीत वाढत्या प्रवाशांमुळे पुणे एस्.टी.च्या उत्पन्नात वाढ !
गतवर्षीपेक्षा २ कोटी ८५ लाख रुपयांची अधिक वाढ
पुणे – दिवाळी हंगामात वाढत्या प्रवाशांमुळे एस्.टी.च्या उत्पन्नात वाढ झाली. यात पुणे विभागाला यंदा गेल्या वर्षीपेक्षा २ कोटी ८५ लाख २२ सहस्र रुपयांचे अधिक उत्पन्न मिळाले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली विभागांत कोल्हापूर विभागाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे, तर पुणे विभाग दुसर्या स्थानी आहे.
महामंडळाकडून नोव्हेंबरमध्ये १० टक्के हंगामी भाडेवाढ न करता जादा बसगाड्या सोडल्या होत्या. मुळात एस्.टी. महामंडळाकडे वाहन ताफा अल्प आहे; परंतु प्रवासी संख्या वाढली आहे. कोल्हापूर विभागाने ३ कोटी ४४ लाख ६८ सहस्र रुपयांनी उत्पन्न वाढवले, तर पुणे २ कोटी ८५ लाख २२ सहस्र, सातारा २ कोटी ४६ लाख २२ सहस्र, सोलापूर १ कोटी ५८ लाख ५४ सहस्र, तर सांगली विभागाला सर्वांत अल्प म्हणजे १ कोटी ३६ लाख ९८ सहस्र रुपयांची वाढ उत्पन्नात झाली आहे. त्यामुळे एस्.टी. बसचे विभाग नियंत्रक, यंत्र अभियंता, आगार व्यवस्थापक, शाखाप्रमुख, पालक अधिकारी, साहाय्यक वाहतूक अधीक्षक, चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, अधिकारी यांच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कुसेकर यांनी केले. (योग्य नियोजन आणि सुसूत्रता यांमुळे आर्थिक लाभ झाला. मग एवढी वर्षे महामंडळ आर्थिक तोट्यात असतांना हे नियोजन का केले नाही ? – संपादक)