थोडक्यात महत्त्वाचे !

गांजाविक्री करणारे दोघे अटकेत !

मुंबई – मालवणी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली. अनिलकुमार सिंह आणि अंकित जैस्वाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वसईमधील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १० किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.


आरोपी बसचालकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

मुंबई – कुर्ला परिसरात झालेल्या बस अपघाताच्या प्रकरणात बसचालक संजय मोरे याला कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्याचा परवाना रहित करण्यासाठी राज्य परिवहन विभागाने प्रक्रिया चालू केली असल्याचेही समजते.


नायलॉन मांजामुळे महिलेचा गळा चिरला !

अमरावती – येथे नायलॉन मांजामुळे दीपाली चांडक (वय ३० वर्षे) यांचा गळा चिरला गेला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा फरार !

वसई – रिक्शात बसलेल्या १६ वर्षाच्या मुलीला निर्जनस्थळी नेऊन रिक्शाचालकाने तिचा विनयभंग केला. प्रकाश वर्तक असे त्याचे नाव असून सध्या तो फरार आहे.

संपादकीय भूमिका

अशांवर कठोर कारवाईच हवी !


आरोपीने न्यायाधिशांवर चप्पल भिरकावली !

ठाणे – येथील सत्र न्यायालयात हत्या खटल्याची सुनावणी चालू असतांना २२ वर्षांच्या आरोपीने न्यायाधिशांवर चप्पल भिरकावली; मात्र ती त्यांच्या अंगावर न जाता टेबलासमोरील लाकडी चौकटीवर आदळली आणि बेंच क्लार्कजवळ पडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. न्यायाधिशांनी खटल्याच्या सुनावणीचा पुढील दिनांक घोषित केल्याने आरोपीने संतप्त होऊन वरील प्रकार केला.

संपादकीय भूमिका

आरोपीने न्यायाधिशांवर चप्पल भिरकावली, ही घटना जनतेचा न्याययंत्रणेवरील विश्वास उडाल्याचे द्योतक !


वाघोली (पुणे) येथे डंपरने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले !

३ जण जागीच ठार, ६ जण गंभीर घायाळ

पुणे – वाघोली परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर झोपलेल्या नागरिकांना मद्यधुंद अवस्थेतील डंपरचालकाने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून ६ जण गंभीर घायाळ आहेत. डंपरचालक गजानन तोटे याला अटक केली आहे. ही घटना २२ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली आहे. घायाळांवर ससून रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे सर्व कामगार अमरावतीहून पुण्यात आले होते. रात्री ते पदपथावर झोपले होते.