आपला प्रपंच भगवंत चालवतो, ही जाण ठेवावी !
श्रीमहाराजांचे (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे) एक उत्तम शिष्य निवृत्ती वयानंतर घरी बसले. निवृत्तीवेतन अल्प असल्यामुळे मुलाच्या उत्पन्नातून घरखर्च चाले. श्रीमहाराज त्यांच्या मुलाला म्हणाले, ‘प्रतिमास खर्चाची तोंड मिळवणी होते का ? ‘आपण सर्व चालवता’, हे उत्तर मला नको. प्रत्यक्ष परिस्थिती काय ती सांग.’ मुलाने सांगितले, ‘मासाचे शेवटचे १० दिवस जरा जड जातात.’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘अरे, ही फार चांगली गोष्ट आहे. या दिवसांत तरी आपला प्रपंच भगवंत चालवतो, याची जाणीव रहाते. अशी ओढ रहाणे, ही भगवंताची कृपाच समजावी.’ जगामधील एकंदर पैशाविषयी श्रीमहाराज म्हणतात, ‘पृथ्वीवर एक चतुर्थांश भूमी आणि तीन चतुर्थांश पाणी आहे. पाण्याचे एकंदर प्रमाण कायम रहाते. त्याच्यात पालट होत नाही. पृथ्वीवर एकीकडे भरती येते, तेव्हा उलट बाजूला ओहोटी असते. आपल्याकडील भरभराट, म्हणजे दुसरीकडे कुठेतरी खडखडाट आहे, हे निश्चित समजावे. याचा अर्थ दुसर्याच्या विपत्तीतूनच आपला संपत्तीसंचय होतो; म्हणून दुसर्या कुणाच्या विपत्तीतून द्रव्यसंचय करून श्रीमंत व्हायचे आणि त्या संपत्तीचा उपभोग घ्यायचा, हे कोणत्याही भगवद्भक्ताला हितावह नाही.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)