संपादकीय : ट्रम्प विरुद्ध ट्रुडो
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला ‘अमेरिकेचे ५१ वे राज्य’ संबोधल्यामुळे कॅनडातील जनता दुखावली आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात अनेक प्रचारसभांमध्ये ‘त्यांची परराष्ट्रनीती काय असणार’, हे स्पष्टपणे बोलून दाखवले होते. त्या वेळी कॅनडा, मॅक्सिको आदी देशांमधून येणार्या निर्वासितांवर कारवाई करण्याची घोषणा त्यांनी केली होती. ‘जोपर्यंत हे देश तेथून येणारे निर्वासितांचे लोंढे, तसेच अमली पदार्थांची अमेरिकेत तस्करी करणे बंद करत नाहीत, तोपर्यंत अमेरिका त्यांच्याकडून घेत असलेल्या वस्तूंवर २५ टक्के कर लावणार’, असा सज्जड दम त्यांनी दिला होता. त्यामुळे ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यावर ज्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या छातीत धडधडले असेल, त्यांपैकी कॅनडा हा एक देश होता. अलीकडेच ट्रम्प यांनी या सूत्रावर परत भाष्य केल्यामुळे जस्टिन ट्रुडो त्यांची सर्व कामे बाजूला ठेवून लगबगीने अमेरिकेत पोचले आणि त्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर या भेटीविषयी भाष्य करतांना ट्रुडो यांना ‘गव्हर्नर’ संबोधले होते. जसे भारतात राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री संबोधले जाते, तसे अमेरिकेमध्ये ‘गव्हर्नर’ संबोधले जाते. एक प्रकारे कॅनडाच्या पंतप्रधानांना हिणवण्याचा आणि अवमान करण्याचाच हा भाग होता. कॅनडातील १३ टक्के जनतेला ‘कॅनडाने अमेरिकेत विलीन व्हावे’, असे वाटते. याचा संदर्भ द्यायलाही ट्रम्प विसरले नाहीत. ट्रम्प यांनी एवढा अवमान केल्यावर ट्रुडो मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्यासमोर नांगी टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लोकांमध्ये रोष वाढला आहे. मागील काही वर्षांत कॅनडामध्ये ट्रुडो यांची लोकप्रियता न्यून होत चालली आहे. ६६ टक्के लोकांना ‘ते पंतप्रधानपदी राहू नयेत’, असे वाटत आहेत. त्यातही काही दिवसांपूर्वी सरकारमधील अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी ट्रुडो यांच्याशी काही धोरणांवर मतभेद असल्याचे उघडपणे सांगत त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. या एवढ्या अस्थिरतेचा सामना करत असतांना ट्रम्प यांच्या अशा विधानांमुळे ट्रुडो यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. ट्रम्प आणि ट्रुडो यांच्यातील धूसफूस ही काही नवीन गोष्ट नाही. ट्रम्प हे कडवे उजवे म्हणून ओळखले जातात, तर ट्रुडो हे सुधारणावादी आहेत. त्यामुळे ट्रम्प यांना ट्रुडो नकोसे वाटतात. ‘पुढील निवडणुकीत ट्रुडो यांचा लिबरल पक्ष सपाटून मार खाणार असून कंझर्व्हेटिव्ह पक्ष निवडून येणार’, असा अंदाज बांधला जात आहे. ट्रम्प यांना तेच हवे आहे. सध्या तरी ट्रम्प यांनी केलेल्या ‘वारां’चा प्रतिकार करू न शकल्यामुळे ट्रुडो यांची ‘निष्क्रीय पंतप्रधान’, अशी बनलेली प्रतिमा आणखीनच गडद झाली आहे.
ट्रम्प यांची परराष्ट्रनीती
ट्रम्प हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पुढील ५ वर्षे जागतिक राजकारणात मोठे उलथापालथ होतील, याविषयी कुणाचेच दुमत असू नये; मात्र ‘अशी आक्रमक धोरणे राबवण्याचा आरंभ ते कॅनडापासून करतील’, असे कुणाला वाटले नव्हते. गेली अनेक वर्षे अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योग आदी क्षेत्रांमध्ये अनेक करार झाले आहेत. त्यामुळे जगभर कॅनडाकडे ‘अमेरिकेचा निष्ठावान मित्र’ म्हणून पाहिले जाते. असे असतांनाही ‘ट्रम्प कॅनडाला का झिडकारत आहेत ?’, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे कॅनडा दुखावला, तर जागतिक राजकारणात काय पडसाद उमटतील ? जर ट्रम्प यांच्या कार्यकाळात मित्रदेशांना अशी वागणूक मिळत असेल, तर शत्रूराष्ट्रांचे काय ? ट्रम्प यांनी कॅनडाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा ५ वर्षांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ कसा असेल, याची झलक दिसून येत आहे. यापुढे सर्व देशांवर अमेरिकेची दादागिरी चालेल आणि जगाला अमेरिकेपुढे झुकावेच लागेल, अशा प्रकारची धोरणे ट्रम्प पुढील काळात राबवतील, असा कयास आहे. सध्या कॅनडाला अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. त्यामुळे तेथील ट्रुडो सरकार अस्थिर आहे. अशीच अस्थिरता जर्मनी, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया या देशांमध्येही दिसून येते. या देशांच्या अंतर्गत राजकारणामध्येही ट्रम्प यांनी लुडबुड करून तेथील अस्थिरता अधिक वाढवण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. कॅनडाच्या संदर्भातील ट्रम्प यांची देहबोली किंवा संवाद साधण्याचे त्यांनी अवलंबलेले तंत्र यातून तरी हेच दिसून येते. जागतिक स्तरावर संवाद साधून किंवा चर्चा करून दोन देशांमध्ये तणाव न्यून करण्याकडे संबंधित देशांचा कल असायचा. ट्रम्प यांनी घेतलेल्या विसंवादाच्या भूमिकेतून ‘अमेरिकेच्या हिताच्या आड येणार्या कुणाचीही गय केली जाणार नाही’, असा अलिखित संदेश ट्रम्प देऊ पहात आहेत. अमेरिकेत विकल्या जाणार्या परदेशी वस्तूंवर कर लावण्याविषयी ट्रम्प वारंवार पुनरुच्चार करत असतात. याविषयी त्यांनी चीनला, एवढेच काय, तर भारतालाही धमकावले आहे. अशा भूमिकेमागे ट्रम्प यांचे राष्ट्रवादी धोरण असल्याचे म्हटले जाते. ट्रम्प यांनी आक्रमक परराष्ट्रनीती राबवल्यास भारतालाही त्यांच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे.
असाही राष्ट्रवाद !
ट्रम्प यांना जगभरातील विरोधकांकडून ‘माथेफिरू’, ‘उद्धट’, ‘उर्मट’, ‘विक्षिप्त’, ‘भडक डोक्याचे’, अशी अनेक विशेषणे लावली जातात. ट्रम्प यांना त्याचे सुवेरसुतक नाही. ट्रम्प यांनी कॅनडाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली, तर त्यांचे काय चुकले ? जगात निर्वासितांची समस्या बहुतांश देशांना भेडसावतांना दिसत आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या मागील राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्य करणार्या स्थलांतरितांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. भारतालाही गेली अनेक वर्षे घुसखोरीच्या समस्येने ग्रासले आहे. राष्ट्रहितासाठी स्वतःच्या मित्रदेशालाही न जुमानणार्या ट्रम्प यांच्याकडून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
जगाने आतापर्यंत कणखर, प्रतिभावान, दूरदृष्टी असणारी अनेक नेतृत्वे पाहिली आहेत आणि त्यांचा आदरही केला आहे. या कुठल्याच निकषात ट्रम्प बसत नाहीत. प्रचलित असलेल्या पठडीत राहून ट्रम्प राजकारण करतील, अशी आशा बाळगणेही चुकीचे ठरेल. अविचाराने किंवा उथळपणे वागणे, हे चुकीचेच असते; मात्र राष्ट्रहितासाठी कुणी अविचाराने वागत असेल, तर त्याला काय म्हणायचे ?