मंदिरांवर अन्याय होऊ देणार नाही ! – मंत्री भरतशेठ गोगावले
मंदिरांच्या समस्या सोडवण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !
नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहील. मंदिरांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी दिले. त्यांच्या समवेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाची नागपूर विधानभवनात बैठक झाली. त्या वेळी हे आश्वासन दिले. या वेळी मंदिरांच्या समस्यांच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी वक्फ बोर्डाच्या माध्यमातून मंदिरांच्या शेतभूमीवरील अतिक्रमण आणि मंदिरांच्या अन्य समस्यांवर विस्तृत चर्चा झाली. मंत्री गोगावले पुढे म्हणाले की, मंदिरांच्या भूमी वक्फ बोर्डाकडून बळकावण्याच्या प्रकरणांच्या संदर्भात सरकार गंभीर आहे. वक्फ कायद्याच्या संदर्भात केंद्र सरकारही गंभीरतेने विचार करत आहे. मंदिरांची बेकायदेशीरपणे बळकावली गेलेली भूमी पुन्हा मंदिरांच्या कह्यात येण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. मंदिर महासंघाच्या वतीने नुकतीच मंदिरांच्या समस्यांच्या संदर्भात मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री संजय राठोड, मंत्री आशिष जयस्वाल आणि अन्य मान्यवर यांच्या भेटी घेऊन निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रात मंदिरांच्या भूमीचे बेकायदेशीर हस्तांतर केल्यास केवळ महसुली आणि दिवाणी प्रकरणे प्रविष्ट होत आहेत; परंतु गुन्हेगार म्हणून दोषींवर कायदेशीर कारवाईचे प्रावधान नाही. याउलट गुजरात, ओडिशा, कर्नाटक, आसाम आदी राज्यांमध्ये मंदिरांच्या भूमी बळकावण्याच्या विरोधात कठोर ‘ॲंटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ आहेत. गुजरातच्या कायद्यात तर १४ वर्षांची शिक्षा, त्यासोबत भूमीच्या शासकीय बाजारमूल्याइतक्या दंडाचे कठोर प्रावधान आहे. असा कायदा महाराष्ट्रातही तात्काळ झाला पाहिजे.
या वेळी महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, महासंघाच्या ‘राज्य कोअर कमिटी’चे सदस्य श्री. अनुप जयस्वाल, नागपूर येथील ‘श्री बृहस्पती मंदिरा’चे विश्वस्त तथा मंदिर महासंघाचे विदर्भ संयोजक श्री. रामनारायण मिश्र, ‘श्री पंचमुखी हनुमान मंदिरा’चे विश्वस्त तथा मंदिर महासंघाचे नागपूर जिल्हा संयोजक श्री. दिलीप कुकडे, नांदेड येथील वजिराबाद हनुमान मंदिराचे श्री. गणेश महाजन, अहिल्यानगर येथील ‘श्री भवानीमाता मंदिरा’चे विश्वस्त अधिवक्ता अभिषेक भगत, अमरावती येथील ‘श्री पिंगळादेवी संस्थान’चे श्री. विनीत पाखोडे, भाजपचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्री. रवी ज्ञानचंदानी, नागपूर येथील ‘हिलटॉप दुर्गामाता मंदिरा’चे पुजारी श्री. प्रदीप पांडे, नागपूर येथील ‘श्री सिद्धारूढ शिव मंदिरा’चे श्री. प्रकाश तपस्वी, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, समितीचे नागपूर समन्वय श्री. अभिजित पोलके आणि इतर मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते.