‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव’ पुरस्कार म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद ! – डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्काराने सन्मानित !
चिंचवड (जिल्हा पुणे) – महान गणेशभक्त ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार’ म्हणजे श्री गणेशाचा आशीर्वाद आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा सन्मान आहे, अशा भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केल्या. भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त देण्यात येणार्या यंदाच्या ‘मोरया गोसावी महाराज जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्रविड यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार डॉ. माशलेकर यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र अमेय माशेलकर यांनी स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. माशेलकर या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत. मानपत्र, सन्मानचिन्ह, धनादेश, श्री मोरया गोसावी महाराजांची प्रतिमा आणि शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार सोहळ्यासाठी पाठवलेल्या लेखी संदेशात डॉ. माशेलकर यांनी वरील भावना व्यक्त केल्या.
देशासाठी स्वतंत्र राज्यघटना आणि लोकशाही यांचा विचार मांडणारे लोकमान्य टिळक हे पहिले दूरदर्शी नेतृत्व ! – अविनाश धर्माधिकारी, निवृत्त सनदी अधिकारी
लोकमान्य टिळकांना नेहमीच कर्तृत्वापेक्षा त्यांच्या आडनावावरून लक्ष्य करण्याचे काम तत्कालीन इंग्रज सरकार आणि विरोधक यांनी केले. ‘टिळक म्हणजे ब्राह्मणी वर्चस्ववादी विचारांचे नेतृत्व’ असा अपप्रचार त्यांच्याविषयी केला गेला; मात्र या देशासाठी स्वतंत्र उत्तरदायी सरकार असावे आणि त्याची निवड ‘एक व्यक्ती, एक मत’ या प्रक्रियेतून व्हावी’, असा विचार त्यांनी सर्वप्रथम मांडला. यामध्ये कुठेही जातीभेद न करता सर्वांना समान हक्क असावा आणि त्यासाठी देशाला स्वतंत्र राज्यघटना अन् लोकशाही असावी, अशी भूमिका मांडणारे देशातील पहिले नेतृत्व लोकमान्य टिळक हे होते, असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले. चिंचवड येथील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ‘टिळक पर्व’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.
विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्या’ची सांगता !
ह.भ.प. पुरुषोत्तम दादा पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनासह महापूजा, नगरप्रदक्षिणा या धार्मिक कार्यक्रमांनी आणि भव्य आतषबाजीच्या समवेतच महाप्रसादाने अन् धुपारतीने श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६३ व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली. समारोपाच्या दिवशी पहाटे ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’चे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव आणि चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या श्रींच्या संजीवन समाधीची विधीवत् महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. टाळ आणि वाद्यांच्या गजरात ‘श्रीं’च्या पालखीची नगरप्रदक्षिणा पार पडली. या वेळी सहस्रो मोरया भक्तांनी या नगरप्रदक्षिणेत सहभाग घेत पालखीचे भक्तीभावे दर्शन घेतले. ५ दिवस चाललेल्या या संजीवन समाधी सोहळ्यात विविध धार्मिक – सामाजिक कार्यक्रम, नामवंत कलाकार यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे, तसेच नामवंत व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचे आणि पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.