तबलावादन क्षेत्रातील अत्युच्च पातळीचे कलाकार कै. उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडून तबलावादक श्री. योगेश सोवनी यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
श्री. योगेश सोवनी यांचे मनोगत
‘वर्ष १९९७ ते २००० पर्यंत मी तबलावादनाचे शिक्षण उस्ताद अल्लारखाँ (उस्ताद झाकीर हुसेन यांचे वडील) यांच्याकडे घेत होतो. नंतर वर्ष २००० पासून मला उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडे शिकण्याची अमूल्य संधी मिळाली आणि त्यांच्या सहवासात माझ्या तबलावादनाच्या प्रवासास आरंभ झाला. या कालावधीत मला उस्ताद झाकीर हुसेन यांना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. मला त्यांच्या सान्निध्यात शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे मार्गदर्शन या लेखाच्या माध्यमातून उस्ताद झाकीरभाई यांच्या चरणी कृतज्ञताभावे अर्पण करतो.
१. उस्ताद झाकीर हुसेन यांचा लाभलेला सहवास आणि त्यांचे लाभलेले अमूल्य मार्गदर्शन
१ अ. गणपतीच्या कृपेमुळे उस्ताद झाकीर हुसेन तबलागुरु म्हणून लाभणे : ‘सांगली संस्थानच्या राणी सरकार पद्मिनीराजे पटवर्धन यांच्या गणपति मंदिरातील कार्यक्रमात माझे वडील (श्री. श्रीपाद सोवनी) गात असतांना मी त्यांना तबल्याची साथ करायला जात असे. एक दिवस राणी सरकार पद्मिनीराजे पटवर्धन यांनी कार्यक्रमाच्या वेळी गणपति मंदिराच्या दारातच मला विचारले, ‘‘तुझी झाकीर हुसेन यांच्याशी भेट झाली आहे का ?’’ त्या वेळी मी त्यांना ‘नाही’, असे सांगितले; मात्र त्यानंतर ‘एका मासातच म्हणजे ऑक्टोबर १९९३ मध्ये चिंचवड येथील एका कार्यक्रमात मला उस्ताद झाकीर हुसेन यांच्या मागे बसून तानपुरा वाजवण्याची संधी मिळाली. ‘ही गणपति देवतेची माझ्यावर कृपाच आहे’, असे मला वाटते.
या कार्यक्रमात मला उस्ताद झाकीर हुसेन यांचे तबलावादन जवळून ऐकण्याची संधी मिळाली आणि त्या वेळी मला माझ्यातील उणिवा लक्षात येऊन ‘मी पुष्कळ प्रयत्न करायला हवेत’, याची मला जाणीव झाली.
१ आ. उस्ताद झाकीर हुसेन यांनी सराव (रियाज) करण्याचे महत्त्व मनावर बिंबवणे : मी ज्या ज्या वेळी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या घरी जात असे, त्या वेळी त्यांचा मला पहिला प्रश्न असायचा, ‘‘कैसे हो योगी (ते मला योगेश ऐवजी योगी म्हणायचे) ?’’ आणि दुसरा प्रश्न असायचा, ‘‘रियाज कैसे चल रहा है ?’’ ‘रियाज कितने घंटे होता है ?’’ यामुळे माझ्या मनावर तबलावादनाचा सराव (रियाज) करण्याचे महत्त्व बिंबले.
१ इ. उस्ताद झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडून ईश्वराची आराधना करण्याचे महत्त्व लक्षात येणे : उस्ताद झाकीर हुसेन कार्यक्रमाच्या वेळी तबलावादनाच्या आधी डोळे बंद करून तोंडाने काहीतरी पुटपुटत असत. (ते ईश्वराची प्रार्थना करायचे.) पं. शिवकुमार शर्मा हेही संतुर वादनाच्या वेळी एका हाताने तारांवर आघात करायचे, तर दुसर्या हाताने ते त्यांच्या गळ्यातील गणपतीच्या ‘लॉकेट’ला हात लावून डोळे बंद करून मनात प्रार्थना करायचे. कलाक्षेत्रातील या महान विभूतींकडून ईश्वराची आराधना करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. त्यातून मलाही प्रेरणा मिळाली.
२. उस्ताद झाकीर हुसेन यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. उस्ताद झाकीर हुसेन यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना देवतांना नमस्कार करूनच तबलावादनाला आरंभ करायला शिकवणे : उस्ताद झाकीर हुसेन यांच्या शिकवणीवर्गाच्या ठिकाणी एका बाजूला गणपति आणि दुसर्या बाजूला सरस्वतीदेवी यांच्या मूर्ती होत्या. शिकवणीवर्गाला आरंभ होण्याआधी सगळे शिष्य या दोन्ही देवतांना आणि त्यानंतर गुरूंना नमस्कार करूनच तबलावादन करत असत. उस्ताद झाकीर हुसेन यांनी विद्यार्थ्यांना ‘कलेची आराधना करतांना देवतेचे अधिष्ठान महत्त्वाचे असते’, हे शिकवले.
२ आ. नम्रता
१. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या कार्यक्रमाच्या वेळी वयस्कर आणि गुणी कलाकार प्रेक्षक या नात्याने आले असल्यास झाकीरभाई आधी व्यासपिठावर जाऊन तबल्याला वंदन करत आणि नंतर व्यासपिठावरून खाली येऊन त्या कलाकारांना पदस्पर्श करून त्यांना नमस्कार करत. त्यानंतर झाकीरभाई तबलावादन आरंभ करत असत. झाकीरभाई प्रथितयश कलाकार असूनही अन्य कलाकारांना मान देत असत.
२. वर्ष २०२४ मधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी उस्ताद झाकीर हुसेन यांनी शिष्यांकडून स्वतःचे पूजन करून न घेता त्यांनी स्वतः तबलावादन क्षेत्रातील गुणीजन तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि पं. अनिंदो चटर्जी यांचा सत्कार केला.
२ इ. प्रेमभाव : उस्ताद झाकीर हुसेन यांच्यातील प्रेमभाव आम्ही बर्याच प्रसंगात अनुभवत होतो. ते आम्हा प्रत्येकाची प्रेमाने विचारपूस करत आणि प्रसंगी स्वतः आम्हाला साहाय्यही करत.
२ ई. साधकत्व : साधना करणार्या साधकामध्ये जे गुण असणे अपेक्षित आहे, ते गुण आम्हाला उस्ताद झाकीर हुसेन यांच्यामध्ये अनुभवायला येत असत. त्यांच्या आचरणातून आम्हाला साधकत्व लक्षात येत असे.
२ उ. उस्ताद झाकीर हुसेन यांनी ‘तबलावादनाचा अभ्यास कसा करावा ?’, हे शिकवल्यामुळे अन्य कलाकारांचे तबलावादन समजू शकणे : एकदा झाकीरभाईंनी शिकवणीवर्गात आम्हाला ‘कलाकाराचे वादन कसे ऐकायचे ? आपण त्या कलाकारांमधील चांगल्या गोष्टी कशा आत्मसात् करायच्या ? त्यासाठी सराव (रियाज) कसा करायचा ?’, या गोष्टी २ घंटे समजावून सांगितल्या. त्यांच्यामुळेच मी वर्ष २००० नंतर अन्य तबलावादकांचे तबलावादन समजू शकलो आणि अन्य कलाकारांचे तबलावादन ऐकायला आरंभ केला.
२ ऊ. उस्ताद झाकीर हुसेन यांनी स्वतःला गुरु न मानता शिष्यभावात राहून विद्यादान करणे : झाकीरभाईंनी स्वतःला कधी गुरु मानले नाही. त्यांनी शिकवणीवर्गात आम्हाला सांगितले, ‘‘गुरु क्या होता है ? रियाज को ही गुरु मानो । रियाज करो, वही सब कुछ करेगा ।’’ त्यांनी स्वतःला ‘गुरु’ असे कधीच संबोधले नाही. ते कायम शिष्यभावातच राहिले आणि विद्यादान करत राहिले.
२ ए. उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांची प्रशंसा केलेली आवडत नसे.
२ ऐ. उस्ताद झाकीर हुसेन यांनी केलेली ईश्वरी आराधना : आम्ही झाकीरभाईंना गणपति, सरस्वतीदेवी आणि विठोबा यांच्या मूर्तींसमोर नतमस्तक होतांना पाहिले आहे. ते शिकवणीवर्गाच्या वेळी अब्बाजींच्या (उस्ताद अल्लारखाँ यांच्या) छायाचित्रासमोर बसून ‘सरस्वती वंदना …’ आणि ‘वक्रतुंड महाकाय …’ किंवा ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः …’, हे श्लोक म्हणायचे.
२ ओ. उस्ताद झाकीर हुसेन यांची अन्य वैशिष्ट्ये
१. झाकीर भाई म्हणजे विद्वत्तेचे तेज असलेले लोभस व्यक्तीमत्त्व !
२. तबला आणि डग्गा यांचे समतोल सुमधुर वादन म्हणजेच झाकीरभाई !
३. तबला या वाद्याला सर्वाेच्च स्थान मिळवून देणारे झाकीरभाई !
‘आज झाकीरभाई सर्वांना सोडून गेले. त्यांच्या १५ डिसेंबरला झालेल्या निधनाने कलाक्षेत्राची पुष्कळ हानी झाली आहे. झाकीरभाईंनी कळत न कळत बर्याच गोष्टींचे संस्कार आमच्यावर केले. त्यांनी जे शिकवले, जे संस्कार केले, त्याच्या जोरावर पुढे जाणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी त्यांचा आशीर्वाद लाभो’, ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. योगेश सोवनी, संगीत अलंकार (तबला), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२०.१२.२०२४)
डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांचा परिचय !‘श्री. योगेश सोवनी तबलावादक आहेत. ते मूळचे सांगली येथील असून सध्या डोंबिवली येथे वास्तव्याला आहेत. त्यांनी तबलावादनाचे शिक्षण आरंभी सांगली येथील श्री. रमेश गोखले आणि श्री. निशिकांत बडोदेकर यांच्याकडे घेतले. कालांतराने त्यांनी उस्ताद अल्लारखाँ, उस्ताद झाकीर हुसेन, पखवाज मास्टर पं. भवानी शंकर आणि पं. सुधीर माईणकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेतले. त्यांनी तबलावादनात ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. |
आदर्श गुरु-शिष्य-गुरु उस्ताद झाकीर हुसेन आणि शिष्य श्री. योगेश सोवनी !‘श्री. योगेश सोवनी हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात येणार्या संशोधनकार्यात नियमित सहभागी असतात. ‘गुरु उस्ताद झाकीर हुसेन यांच्या प्रती श्री. सोवनी हे सतत शिष्यभावात असल्याने ते उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडून शिकण्याच्या स्थितीत असत. त्यामुळेच ‘त्यांनी गुरूंकडून शिकलेले स्वतःच्या अंतरात कोरून ठेवले आहे’, हे त्यांच्या लिखाणातून लक्षात येते. त्यांनी लिहिलेली ही सूत्रे संगीत साधना करणार्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने महान तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली !’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२०.१२.२०२४) |