US Drops Julani From List : अमेरिकेने सीरियातील बंडखोर जुलानी याला आतंकवाद्यांच्या सूचीतून वगळले !
दमास्कस – सीरियातील ‘हयत तहरीर अल-शाम’च्या (एच्.टी.एस्.च्या) बंडखोर गटाचा नेता अबू महंमद अल-जुलानी आता अमेरिकेसाठी आतंकवादी नाही. अमेरिकेने जुलानी याला आतंकवाद्यांच्या सूचीतून वगळले आहे. अमेरिका सरकारने जुलानीवर ठेवलेले १ कोटी डॉलरचे (८५ कोटी रुपयांचे) बक्षीस रहित केले आहे. सीरियातील बशर अल असद यांचे सरकार उलथवण्यामागे जुलानी आणि त्याची संघटना यांचा हात आहे. असद यांच्याशी अमेरिकेचे वैर होते. (अमेरिकेचा स्वार्थ साध्य झाल्यावर ती तिची धोरणे पालटते, याचे आणखी एक उदाहरण. आतंकवादाचे उच्चाटन करण्याची भाषा करणार्या अमेरिकेचे खरे स्वरूप यातून दिसून येते ! – संपादक)
सीरियातील ‘एच्.टी.एस्.’च्या नेत्यांची बैठक घेतल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतला. अमेरिकेचे साहाय्यक परराष्ट्रमंत्री बार्बरा लीफ यांनी सांगितले की, सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेने ‘एच्.टी.एस्.’ला २०१८ मध्ये ‘आतंकवादी संघटना’ घोषित केले होते. अमेरिका आता ‘एच्.टी.एस्.’ बंडखोर गटाला आतंकवादी संघटनेच्या सूचीतून काढून टाकण्याचाही विचार करत आहे.